देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख महसूल मंडळात ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र वितरण अभियान सोमवारी तहसीलदार कार्यालय, देवरुख येथे संपन्न झाले.
देवरूख महसूल मंडळातील भटके-विमुक्त बांधवांना विविध शासकीय सेवा, योजना व आवश्यक प्रमाणपत्रे सुलभपणे उपलब्ध करुन देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता. अभियानाच्या माध्यमातून आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र, रहिवास/अधिवास दाखला तसेच विवाह नोंदणी आदी सेवांबाबत अर्ज नोंदणी, मार्गदर्शन व आवश्यक कार्यवाही करण्यात आली. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे व क्षमा जाधव, तसेच नायब तहसीलदार सुदेश गोताड उपस्थित होते.
यावेळी कल्पना शशिकांत पंदेरे व नीलिमा संतोष झोरे यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रकरण मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर चौधर यांनी केले, तर अभियानाची प्रस्तावना व उद्देश देवरुखचे मंडळ अधिकारी रोहीत पाठक यांनी मांडला. अभियानाच्या यशस्वितेसाठी देवरुख मंडळातील ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवकांनी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमामुळे भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे व सेवांबाबत एकाच ठिकाणी मार्गदर्शन मिळण्यास मदत झाली.












