लोटे एमआयडीसीतील भूमिपुत्रांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर

रोजगार महाकुंभात केवळ १५ कंपन्यांचा सहभाग; वैभव खेडेकरांनी कंपन्यांना जाब विचारण्याचा दिला इशारा

खेड (प्रतिनिधी) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’चे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विभागाचे मंत्री ॲड. मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यभर विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली.
या रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतही रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या निमित्ताने स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारामध्ये प्राधान्य मिळावे, तसेच औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनी स्थानिक युवकांना अधिकाधिक कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान, भाजपाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी लोटे एमआयडीसीतील कंपन्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराचा मुद्दा ठामपणे मांडला. लोटे एमआयडीसीमध्ये मोठ्या संख्येने उद्योग व कंपन्या कार्यरत असताना स्थानिक युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
लोटे एमआयडीसीमध्ये १५० हून अधिक कंपन्या असूनही रोजगार मेळाव्यात केवळ १५ कंपन्यांनी सहभाग घेतल्याची खंत खेडेकर यांनी व्यक्त केली. औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू असताना स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कंपन्यांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याच्या प्रश्नावर संबंधित कंपन्यांना जाब विचारला जाईल, असा इशाराही खेडेकर यांनी दिला. उद्योगांना आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देताना स्थानिक युवकांच्या कौशल्याचा आणि रोजगाराच्या गरजेचा विचार झाला पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
लोटे एमआयडीसीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास झाला असला, तरी त्या विकासाचा लाभ स्थानिक युवकांना रोजगाराच्या माध्यमातून कितपत मिळत आहे, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक युवकांना विविध उद्योगांमध्ये संधी मिळावी आणि कंपन्यांनी स्थानिक मनुष्यबळाला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, शासनाच्या रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या संधींचा स्थानिक युवकांनी लाभ घ्यावा, तसेच उद्योगांनीही अशा रोजगार उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद देऊन अधिकाधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लोटे एमआयडीसीतील १५० हून अधिक कंपन्यांपैकी केवळ १५ कंपन्यांचा रोजगार मेळाव्यातील सहभाग आणि भूमिपुत्रांच्या कायमस्वरूपी रोजगाराचा उपस्थित झालेला प्रश्न यामुळे आगामी काळात एमआयडीसीतील रोजगार धोरणाबाबत कोणती पावले उचलली जातात, याकडे परिसरातील युवकांचे लक्ष लागले आहे.