१७ व १९ वर्षांखालील गटांत उल्लेखनीय कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये दादासाहेब सरफरे विद्यालय व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली. १७ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाने विजेतेपद पटकावले. उत्कृष्ट सांघिक खेळ, चपळाई, आक्रमकता, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार प्रवेश निश्चित केला.
याचबरोबर १९ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली. तसेच १९ वर्षांखालील मुलगे च्या संघाने द्वितीय क्रमांक, तर १४ वर्षांखालील मुलींच्या संघानेही द्वितीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली. या सर्व संघांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे दादासाहेब सरफरे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विद्यार्थ्यांनी दाखविलेली जिद्द, शिस्त, संघभावना आणि क्रीडानैपुण्य यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस शरद बाईत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व संस्था उपाध्यक्ष प्रताप देसाई, शाळा समिती अध्यक्ष दिनेश शामराव जाधव, संस्थेचे सर्वसन्माननीय सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश विरकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ यांचेकडून खेळाडूंना मार्गदर्शन व प्रशिक्षण देणाऱ्या क्रीडा शिक्षक कबड्डी प्रमुख सुहास पाब्ये आणि सुरज जाधव यांचे विशेष कौतुक करण्यात. तालुक्यात विजयाची मोहर उमटवली; आता जिल्ह्यावरही यशाचा झेंडा फडकवूया! अशी सदिच्छा देत सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. यावेळी तालुकास्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरीनंतर आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही विद्यालयाचा झेंडा उंचावण्याचा निर्धार खेळाडूंनी व्यक्त केला.










