वेरवली बुद्रुक येथील घटना, चोरटा मोटार सायकल वरून पसार, महिला वर्गात भीतीचे वातावरण
संतोष कोत्रे
लांजा :- रस्त्याने चालत जाणाऱ्या ६० वर्षीय महिलेला मोटरसायकलवर बसवून त्यानंतर महिलेचा विश्वास संपादन करत आजी तुमचा फोटो काढतो असे सांगत मोबाईल कॅमेरा तोंडावर आणण्याचा बहाणा करून महिलेच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून चोरटा मोटरसायकल वरून पळून गेल्याची घटना लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. या घटनेने महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद सरिता दिनकर बाणे (वय ६० वर्षे राहणार वेरवली खुर्द डोळेवाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. सरिता बाणे ही महिला मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वाजण्याच्या सुमारास वेरवली बुद्रुक येथीलच डॉक्टर मुळे यांच्या घरी घरकामाला रस्त्याने चालत जात असताना पाठीमागून मोटरसायकलने आलेल्या अज्ञात, अनोळखी इसमाने आजी तुम्ही कुठे चालला आहात? चला मी तुम्हाला सोडतो असे सांगून सरिता बाणे यांना आपल्या मोटरसायकलवर बसवले. त्यानंतर डॉक्टर मुळे यांची घराच्या गेटच्या अलीकडे १०० मीटर अंतरावर त्यांना मोटरसायकलवरून सोडले. त्यानंतर सरिता बाणे या डॉक्टर मुळे यांच्या कंपाउंड च गेट उघडून आत जाऊन गेट बंद करत असताना सदर अनोळखी चोरटा हा त्यांच्या मागे आला आणि आजी थांबा, मी तुमचे फोटो काढतो असे सांगून मोबाईलचा कॅमेरा त्यांच्या तोंडावर आणण्याचा बहाणा करत त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून सदर चोरटा हा मोटरसायकल वरून पसार झाला
याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेने महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.












