राजापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश; नद्या-नाल्यांवर वनराई बंधारे बांधण्याची भाजपा तालुका अध्यक्ष मोहन घुमे यांची मागणी

उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

राजापूर प्रतिनिधी : तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने राज्य शासनाने राजापूर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहिर केला आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी तालुक्यातील सर्व नद्या-नाल्यांवर वनराई बंधारे बांधण्याची मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष मोहन अशोक घुमे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी राजापूरचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. तालुक्यात सध्या पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक नद्या, नाले व ओढे यांचे पाणी वाहून जात आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीच्या पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता आहे. ही संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी तालुक्यातील सर्व नद्या व नाल्यांवर तात्काळ वनराई बंधारे बांधण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या बंधाऱ्यांमुळे पाणीसाठा वाढण्यास तसेच भूजल पातळी उंचावण्यास मदत होईल. त्याचा फायदा शेतकरी आणि ग्रामस्थांना होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे या कामाला तातडीने मंजुरी देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी मोहन घुमे यांनी या निवेदनाने केली आहे. याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही करण्याचे आश्वासन उपविभागिय अधिकारी यांनी दिले आहे.