काजिर्डा येथील प्रस्तावित जामदा प्रकल्पाच्या एकूण बुडीत २०२ हेक्टरपैकी ७५ हेक्टर जमिनीची संयुक्त मोजणी पुर्ण २४० सातबाऱ्यातील २१०० शेतकऱ्यांचा समावेश

स्थानिक शेतकऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता

राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील काजिर्डा येथील प्रस्तावित जामदा प्रकल्पाच्या भू संपादनाची प्रक्रिया आता अधिक वेगाने सुरू झाली आहे. आत्तापर्यंत बुडीत एकूण २०२ हेक्टर क्षेत्रापैकी ७५ हेक्टर क्षेत्राची संयुक्त मोजणी पुर्ण झाली असून यामध्ये २४० सातबारा उताऱ्यांवरिल २१०० शेतकऱ्यांचा समावेश आहे. या मोजणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने निश्चित केलेल्या अनुदानाचे वाटप संबधित विभागाकडून केले जाणार आहे.
यापुर्वी मोजणी पुर्ण झालेल्या व अनुदान उपलब्ध झाल्याने काही लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाकडून जमिनीचा मोबदला देण्यातही आला आहे. एकूणच प्रगतीपथावर असलेली मोजणी प्रक्रिया, काही शेतकऱ्यांना मिळालेला मोबदला यामुळे या प्रकल्पाला होणारा विरोध आता मावळत असल्याची बाबही पुढे आली आहे.
तालुक्यातील काजिर्डा येथील प्रस्तावित जामदा प्रकल्पासाठी बुडीत एकूण २०२ हेक्टर क्षेत्रापैकी आत्तापर्यंत भूमी अभिलेख विभागाकडून सुमारे ७५ हेक्टर क्षेत्राची संयुक्त मोजणी पुर्ण झाली आहे. यामध्ये यामध्ये २४० सातबारा उताऱ्यांवरिल २१०० शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भूमी अभिलेख विभाग, जलसंपदा विभाग, वन विभाग, कृषी विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग अशा संबधित सर्व विभागांकडून ही संयुक्त मोजणी केली जाते. पावसाळयापुर्वी ही मोजणी प्रक्रिया पुर्ण करण्यात आलेली आहे. याबाबतचा अहवाल आता भू संपादन विभागाकडे पाठविला जाणार असून त्यानंतर भू संपादन विभागाकडून भू संपादनाची प्रक्रिया पुर्ण करून पुढील कार्यवाहीसाठी लघुपाटबंधारे विभाग चिपळूण या कार्यलयाकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर या विभागाकडून शासनाच्या नियम व निकषा प्रमाणे त्या शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप केले जाणार आहे. या मोजणी झालेल्या क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांची समंतीपत्रेही उपलब्ध झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. उर्वरित बुडीत क्षेत्रातील जमिन मोजणीही आता लवकरच हाती घेतली जाणार आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी यापूर्वी जलसंपदा विभागामार्फत मौजे मूर या महसूली गावातील मूर पुनर्वसन सांडवा या प्रस्तावाव्दारे सुमारे ३३ हेक्टर क्षेत्र व मौजे काजिर्डा या महसूली गावातील ब्राम्हणखोरे पुनर्वसन गावठाण या प्रस्तावाव्दारे सुमारे २६ हेक्टर क्षेत्र शासन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी अधिग्रहीत करत आहे. त्यापैकी काही लोकाना मोबदला वाटप होवून काही लोकांचे मोबदल्याचे वाटप होण्याची प्रक्रिया सुरु आहे. बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्ताना देखील प्रकल्पग्रस्त म्हणून दयावयाच्या सोयी सवलतीमध्ये भूखंड दिले जाणार आहेत.
एकूणच प्रकल्पाचे भू संपादनाचे काम वेगाने सुरू असल्याने व काही शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित जागेचा मोबदला मिळाल्याने शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त होत आहे. गेले काही वर्षे विविध कारणांनी रखडलेला हा प्रकल्प आता स्थानिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे पुढे सरकू लागला आहे.