संगमेश्वर तालुक्यात हळव्या भात पिकाची कापणी सुरु

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यात सर्वदूर हळवी भातशेती कापणी योग्य तयार झाली असून,शेतकरी वर्ग या भातशेतीच्या कापणीत मग्न झालेला पाहायला मिळत आहे.भातपिकाला चांगला उतारा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.भविष्यात दुष्काळी परिस्थितीची चाहूल लागलेली असताना,शेतकरी वर्ग पिकलेली भात शेती लवकरात लवकर घरी कशी नेता येईल याच्या प्रयत्नात पाहायला मिळत आहे.
महान भातशेती अर्थात अधिक कालावधी घेणारी भातशेती अद्याप परिपक्व झालेली नसून या शेतीला पाण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत.हळवी भातशेती चांगले उत्पन्न देणारी ठरणार आहे.यातच गावोगावी डुक्कर,रान रेडे यांचा त्रास मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना,रात्रीच्या वेळी शेतीची राखण करावी लागत आहे.शेतीच्या भोवताली जुन्या साड्या,जुन्या लाईट च्या माळा आदिनि कुंपण करावी लागत आहे.
वातावरणातील वाढलेला गरमा,ऊन हे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला त्रासदायक ठरत आहे.दुष्काळजन्य परिस्थिती ओढवण्यापूर्वी भातपीकाची कापणी होत असल्याने शेतकरी वर्गात समाधान पहायला मिळत आहे.