‘ओंकार’ वर मशाल फेकणाऱ्यावर कारवाईची मागणी

सहाय्यक वनसंरक्षकांना निवेदन

बांदा : प्रतिनिधी

बांदा परिसरात ‘ओंकार’ हत्तीला हुसकावण्यासाठी वनविभागाच्या पथकाकडून फटाके व पेटत्या मशालींचा वापर केल्याच्या प्रकाराबाबत २६ सप्टेंबर रोजी सावंतवाडी सहाय्यक वनसंरक्षक यांना निवेदन देऊन देखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या गोष्टींची वारंवार पुनरावृत्ती होत असल्याने बुधवारी पुन्हा सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

‘ओंकार’ हत्तीला हुसकावण्याच्या कारवाई दरम्यान फटाके, पेटत्या मशाली अथवा तत्सम उपायांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तसे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशा पद्धतींमुळे हत्ती अधिक आक्रमक होण्याची तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनाद्वारे RRT पथकाच्या कार्यपद्धतीची चौकशी, घटनेची अधिकृत चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणणे तसेच भविष्यात वन्य हत्तींच्या व्यवस्थापनासाठी सुरक्षित व शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी अनुराग सिनारी, ऋषी हरमलकर, तुषार देसाई, मंदार गावडे, अभिजित सिनारी आणि अक्षय प्रभुशिरोडकर उपस्थित होते. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षितते सोबतच वन्यजीवांच्या संरक्षणाचा समतोल राखून संबंधित प्रकरणात वनविभागाने तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी उपस्थितांनी केली.