महाराष्ट्र चेंबरच्या जनसंपर्क, माध्यम व संवाद समितीवर ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांची नियुक्ती!

मालवणच्या पत्रकारिता व पर्यटन क्षेत्राचा राज्यस्तरीय व्यासपीठावर गौरव

महत्त्वपूर्ण समितीत महत्वपूर्ण जबाबदारी ; अध्यक्ष रवींद्र माणगावे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर (MACCIA) या राज्यातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्रातील शिखर संस्थेच्या जनसंपर्क, माध्यम व संवाद समिती (PR, Media & Communication Committee) सदस्यपदी मालवणचे ज्येष्ठ पत्रकार व पर्यटन व्यावसायिक प्रफुल्ल वसंत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी देसाई यांना सुपूर्द केले.

उद्योग, व्यापार, कृषी तसेच पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध विषयांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या विविध तज्ज्ञ समित्या कार्यरत आहेत. याच महत्त्वपूर्ण समितीमध्ये जनसंपर्क, माध्यमे आणि संवाद क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन प्रफुल्ल देसाई यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर ही राज्यातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत असलेली शिखर संस्था आहे. या संस्थेच्या स्थापनेला 2027 ला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यापार क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर जनसंपर्क, माध्यम व संवाद समितीची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवासोबतच पर्यटन व्यवसायाशी संबंधित कार्याचा अनुभव प्रफुल्ल देसाई यांना आहे. मालवण व सिंधुदुर्गच्या पर्यटन, उद्योग-व्यवसाय, स्थानिक विकास आणि विविध सामाजिक विषयांना माध्यमांच्या माध्यमातून सातत्याने व्यासपीठ मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव महाराष्ट्र चेंबरच्या कार्यात उपयुक्त ठरणार आहे.

“जनसंपर्क, माध्यम व संवाद समितीमध्ये सदस्य म्हणून प्रफुल्ल देसाई यांची नियुक्ती करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. त्यांच्या अनुभवाचा समितीच्या कार्याला निश्चितच लाभ होईल,” असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी सांगितले. तसेच या नव्या जबाबदारीसाठी त्यांनी प्रफुल्ल देसाई यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, प्रफुल्ल देसाई यांच्या नियुक्तीबद्दल कोकण विभागाचे उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे, कोकण विभागाचे माजी उपाध्यक्ष डॉ. दीपक परब, ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेंडणेकर, सिंधुदुर्गचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य अॅड. नकुल पार्सेकर, राजन नाईक, विजय केनवडेकर, मनोज वालावलकर, विशाल कामत, कुणाल वरस्कर आणि मिलिंद प्रभू यांनी अभिनंदन केले आहे.

या नियुक्तीमुळे मालवण व सिंधुदुर्गच्या पर्यटन, उद्योग-व्यवसाय तसेच स्थानिक विकासाशी संबंधित विषयांना महाराष्ट्र चेंबरच्या राज्यस्तरीय व्यासपीठावर अधिक प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळणार आहे. प्रफुल्ल देसाई यांच्या या निवडीचे मालवण व सिंधुदुर्गातील पत्रकारिता, पर्यटन आणि व्यावसायिक क्षेत्रातून स्वागत होत आहे.