वैयक्तिक कारणास्तव राजीनामा; संचालक म्हणून काम सुरू ठेवणार
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा भाजपचे पदाधिकारी संदीप हनुमंत सुर्वे यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांना सादर केलेल्या पत्रात नमूद केले आहे.
संदीप सुर्वे यांनी २५ सप्टेंबर २०२५ रोजी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्यामुळे भाजपाचे वर्चस्व बाजार समितीवर आले होते. त्यानंतर सुमारे वर्षभर त्यांनी सभापती म्हणून काम पाहिले. समितीचा कायदा, पोटनियम, उपविधी, कार्यालयीन प्रशासकीय सूचना आणि शासन निर्णय यांच्या अधीन राहून पारदर्शकपणे कामकाज सांभाळल्याचे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
वैयक्तिक कारणास्तव १ ऑक्टोबर २०२६ रोजी सभापतीपदाचा राजीनामा बाजार समितीच्या सचिवांमार्फत जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केल्याचे पत्रात म्हटले आहे. मात्र, सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही बाजार समितीचा संचालक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी पूर्ण सहकार्य राहील, असेही सुर्वे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, संदीप सुर्वे यांची सप्टेंबर २०२५ मध्ये बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली होती.
त्यामुळे आता सुर्वे यांच्या राजीनाम्यानंतर रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढील सभापतीपदी कोणाची निवड होणार, याकडे लक्ष लागले आहे.












