‘ओंकार’ हत्तीवर मशाल फेकणाऱ्यांवर कडक कारवाई करणार

सावंतवाडी उपवनसंरक्षकांचा इशारा ; ७ जणांना कारणे दाखवा नोटीस

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यात अत्यंत शांतपणे वावरणार्‍या ‘ओंकार’ हत्तीवर पेटती मशाल फेकल्याचा अमानुष आणि धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ निदर्शनास आल्यानंतर वन्यजीव प्रेमी आणि स्थानिक नागरिकांमधून अत्यंत तीव्र संताप व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकरणाची सावंतवाडी वन विभागाने तातडीने दखल घेतली असून, घटनेच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या ३ वनरक्षक आणि ४ हाकारे अशा एकूण ७ जणांना वन विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. संपूर्ण चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी दिला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील कास गावात दोन दिवसांपूर्वी ओंकार हत्तीवर पेटती मशाल फेकण्यात आल्याचा एक व्हिडिओ वनविभागाच्या निदर्शनास आला होता. या व्हिडिओमध्ये प्रथमदर्शनी हत्तीवर मशाल फेकल्याचे स्पष्ट दिसत आहे. ही घटना सावंतवाडी वनपरिक्षेत्रात घडल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश सावंतवाडी वनक्षेत्रपालांना देण्यात आले आहेत. ही घटना कोणत्या परिस्थितीत घडली आणि मशालीचा वापर शासकीय कर्मचाऱ्याने केला की एखाद्या खाजगी व्यक्तीने केला, याची संपूर्ण खात्री करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

सध्या सलग शासकीय सुट्ट्या असल्याने मंगळवारी या घटनेचा संपूर्ण सविस्तर चौकशी अहवाल प्राप्त होणार आहे. हा अहवाल हाती आल्यानंतर संबंधित दोषींविरोधात नियमानुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी दिली आहे. सावंतवाडी वन विभागाकडून सुरू असलेल्या या धडक कारवाईमुळे वन्यजीवांना इजा पोहोचवणाऱ्यांवर आता कायदेशीर बडगा उगारला जाणे निश्चित मानले जात आहे.