शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या अविष्काराने कोकणातील शेतकरी भारावले


पंचक्रोशी ग्रामविकास समितीच्या वतीने जळगांव येथे कृषी सहलीचे आयोजन

संतोष मोंडे l राजापूर: जैन इरिगेशन ही जगातील सर्वात मोठी सुक्ष्म सिंचन कंपनी आहे. सुमारे दोन हजार तीनशे एकर पडीक जमिनीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत जळगांव येथे जैन इरिगेशनने माती, पाणी, पीक आणि हवामान यांचा सुयोग्य समतोल साधत लाखो फळ झाडांची लागवड करून शेतीतले नंदनवन फुलविले आहे. राजापूर तालुक्यातील सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी नुकतीच या प्रकल्पाला भेट दिली. तेथील शेतीत करण्यात आलेल्या जागतीक स्तरावरील नव-नव्या प्रयोगाने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अविष्काराने कोकणातील शेतकरी अक्षरश: भारावून गेले.

जैन इरिगेशनचे संस्थापक पद्म्रश्री भवरलाल जैन यांनी स्थापन केलेल्या या जैन हायटेक अग्रीकल्चर पार्क ला संपूर्ण देशातून आणि विदेशातून दरवर्षी सुमारे एक लाख शेतकरी, विद्यार्थी, बँकर्स, विविध संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी भेट देत असतात. या ठिकाणी त्यांचे अगत्यपुर्वक स्वागत आणि पाहुणचार केला जातो.
कोकणातील आपल्या शेतकरी बांधवांना या आधुनिक पध्दतीने केल्या जाणाऱ्या शेतीची आणि शेतीतील तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून पंचक्रोशी ग्रामविकास समिती राजापूर मुंबईचे अध्यक्ष अनिल भोवड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय समितीचे प्रमुख आदिनाथ कपाळे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून या कृषी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुंबई आणि ग्रामिण भागातून ४७ शेतकरी सहभागी झाले होते. त्यामध्ये तरूण आणि काही ज्येष्ठ शेतकऱ्यांचा समावेश होता.
दोन दिवसांच्या या अभ्यास दौऱ्यात जैन हायटेक अग्रीकल्चर पार्क येथील ‘गुरूकुल’ या संकुलात या शेतकऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती. कंपनीच्या वतीने कंपनीचे जनसंपर्क अधिकारी गिरीष कुलकर्णी यानी या शेतकऱ्यांचे स्वागत केले. तर कंपनीच्या स्थापनेपासून आजवरच्या वाटचालीविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. तर या दोन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यात हायटेक शेती, बायोटेक लॅब, टिश्यु कल्चरने होणारी रोपांची निर्मिती, शेतीत होणारे विविध प्रयोग याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि दर्शन घडविले. कोकणात पारंपारिक पध्दतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही अचंबीत करणारी गोष्ट होती.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ही भारतातील जळगाव शहरात स्थित एक बहुराष्ट्रीय समूह आहे. यामध्ये बारा हजार पेक्षा जास्त कर्मचारी, अकरा हजार डीलर्स आणि वितरकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. ठिबक आणि स्प्रिंकलर सिंचन प्रणाली आणि त्याचे घटक, निरीक्षण आणि नियंत्रणासाठी एकात्मिक सिंचन ऑटोमेशन सिस्टम, डोसिंग सिस्टम, पीव्हीसी आणि पीई पाइपिंग सिस्टम, प्लास्टिक शीट, हरितगृह, जैव-खते, सौर उर्जा यासह वैविध्यपूर्ण उत्पादनांचा विकास, निर्मिती, आणि विक्री कंपनी करते. सोलर वॉटर-हीटिंग सिस्टम, सोलर वॉटर पंप, बायोगॅस प्लांट्स, फोटोव्होल्टेइक सिस्टम आणि टिश्यू कल्चर प्लांट्स तसेच निर्जलित भाज्या, मसाले, फळप्रक्रिया यामध्ये कार्यरत आहे. कंपनी विविध प्रकल्पांबरोबरच कृषी सहाय्य सेवा देखील प्रदान करत असल्याची माहिती श्री. कुलकर्णी यांनी यावेळी दिली.

अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत दिवंगत उद्योगपती पद्मश्री भवरलाल जैन यांनी सात हजार रूपयांच्या अल्प भांडवलात उभारलेल्या जैन उद्योग समुहाने आज मोठी भरारी घेतली आहे. भवरलाल जैन यांच्या निधनानंतर त्यांचे थोरले चिरंजिव अशोक जैन यांनी जैन उद्योग समुहाच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारले आहेत. अशोक जैन यांच्यासह त्यांच्या तीन भावडांनी अथक परिश्रम घेऊन जैन उद्योग समुह सातासमुद्रापार पोहोचवला आहे. तीस वेगवेगळया देशात कंपनीचे प्रकल्प कार्यरत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

सुरूवातील जैन हायटेक पार्कची सफर घडविण्यात आली. ६५० एकर मध्ये हा प्रकल्प वसला आहे. यामध्ये शेती आणि शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या वेगवेगळया गोष्टींचे संशोधन केले जाते. तर आंबा, पेरू, डाळींब, मोसंबी, सिताफळ यांचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी असलेल्या बायोटेक लॅबमध्ये संशोधन, नविन भविष्याची शेती, त्यामध्ये एरोपोनिक्स, हायड्रोपोनिक्स, व्हर्टीकल फार्मींग, स्वाईललेस मिडिया फार्मींग, टेक्नोप्लान्ट, ग्रीन हाऊस या विषयीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. आगामी काळातील आधुनिक शेतीतील जे नविन प्रयोग आहेत. ते शेतकऱ्यांना कसे किफायतशीर आहेत याविषयीची माहिती या वेळी देण्यात आली.

त्याचबरोबर टिश्यु कल्चर पार्कमध्ये वर्षाला केळी, डाळींब, मोसंबी, हळद, आले अशा वेगवेगळया प्रकारच्या फळांची टिश्यु कल्चर रोपे तयार केली जातात. दरवर्षी १५ कोटी रोपे या ठिकाणी निर्माण केली जात असून भारतातील सर्वात मोठी टिश्यु कल्चर लॅब ही या निमीत्ताने शेतकऱ्यांना पाहायला मिळाली. कोकणात होणारी आंब्याची लागवड अतिघनदाटपणे करून कशा प्रकारे जास्तीचे उत्पन्न मिळविता येईल आणि भातामध्ये ठिबक सिंचन पध्दतीचा अवलंब कसा केला जातो याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळाले.

शेतकऱ्यांना रोपे दिल्यानंतर लागवडी पासून काढणी, काढणीपश्चात विक्री पर्यंतचे सर्व मार्गदर्शन या ठिकाणी शेतकऱ्यांना केले जाते. विविध प्रकारच्या फळावर प्रक्रिया करून उत्पादनांची निर्मिती केली जाते. कांदा निर्लजलीकरण हा महत्वपुर्ण प्रोजेक्टही कंपनी चालवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सोलर एनर्जी प्रकल्पातून ८.५ मॅगावॅट विज निर्मीती केली जात आहे. तसेच बायोगॅस, जैन पाईप कंपनीत ६ मीमी पासून २५०० मीमी व्यासापर्यंत पाईप निर्मिती केली जात आहे.

या प्रकल्पाच्या मुख्यालयापासून बारा ते पंधरा किमी परिसरात असलेल्या विविध प्रकल्पांची भेट शेतकऱ्यांना घडवून आणण्यात आली. भाऊंची सृष्टी परिसरातील रोपवाटिका यामध्ये नवग्रह, नक्षत्र, तिर्थंकर, सप्तर्षी या झाडांची केलेली लागवड, अतिघनदाट पध्दतीने करण्यात आलेली आंबा, डाळींब, पेरू, मोसंबी, चिकू, फणसाची लागवड तर याच परिसरातील जैन व्हॅली येथील गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आलेली जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री भवरलाल जैन यांचे पीई व पीव्हीसी पाईप पासून बनविलेले मोजेक पोर्ट्रेट, ‘श्रद्धाधाम’ परिसर, तसेच परिसरातील ‘गांधी तिर्थ’ हे महात्मा गांधीच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारे म्युझीयम यानिमित्ताने शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.

जैन हिल्स परिसरातील पावसाचे वाहून जाणारे पाणी नियोजपूर्वक अडवून ते जमिनीत झिरपावे, यासाठी अत्यंत नेटके नियोजन करण्यात आले आहे. यासाठी या परिसरात १२ तळी, २७ विहीरी, २८ विंधन विहिरी, ४ मोठया वॉटर टँकची निर्मीती करण्यात आली आहे. त्यातून या संपूर्ण परिसराला पाणी पोहचविले जाते. तर समाजाचे आपण काही देणं लागतो या भावनेतून कंपनीच्या सीएसआर फंडातून विविध लोकोपयोगी, समाजोपयोगी उपक्रम कंपनीमार्फत राबविले जात असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.
शेतकऱ्यांनी यावे, स्वागत आहे!
जैन इरिगेशनच्या वतीने दरवर्षी शेतीतले होत असलेले बदल आणिण जगासमोर असलेलेले शेती आणि शेतकऱ्यांसमोर प्रश्न या विषयी दरवर्षी १५ डिसेंबर ते २० फेब्रुवारी या दरम्यान शेतकऱ्यांसाठी आगामी काळातील शेतीतील बदल आणि कोणते नविन तंत्रज्ञान विकसीत होत आहे. याविषयीचे प्रदर्शन भरविले जाते. यावेळी शेतकऱ्यांनी अवश्य यावे. आगामी काळातील शेतीतील प्रयोगाविषयी माहिती घ्यावी, आपण नव्या टेक्नॉलिकडे वळलो तर आपल्या शेती आणि जीवनमानामध्ये मोठा बदल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल असे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.
संचालकांची अनाहुत भेट

या अभ्यासदौऱ्यादरम्यान एरवी मुंबईला असणारे आणि कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मुख्यालयी आलेल्या कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन आणि जाँईंट मॅनेजिंग डायरेक्टर अजित जैन यांची अनाहुत भेट घडली. यावेळी त्यांनी कोकणातून आलेल्या तरूण शेतकऱ्यांशी आस्थेने संवाद साधला. कोकणामध्ये आपण व्यवसायासाठी इच्छुक असल्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.
गावची पडीक जमिन लागवडीखाली आणण्याचा निर्धार
शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून पुढील काळात गावाकडे असणारी पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना प्रबोधन करून ही जमीन लागवडीखाली आणण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचा निर्धार या अभ्यास दौऱ्यात सहभागी शेतकऱ्यांनी केला आहे.

पंचक्रोशी समितीचे अध्यक्ष अनिल भोवड यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव विश्वास राघव, आदिनाथ कपाळे, संदेश मिठारी, अनिल राऊत आणि समिती पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. दोन दिवसांच्या या कृषी सहलीतून शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नव नविन प्रयोगाने शेतकरी भारावून गेले होते.
——————-