महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही
आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे, चौकुळ, नेने, मासुरे आणि केगद या गावांमधील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला कबुलायतदार गावकर जमिनींचा प्रश्न येत्या डिसेंबर महिन्यापूर्वी पूर्णपणे मार्गी लावण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. यासंदर्भात आयोजित बैठकीत माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, सिंधुदर्गाच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांच्यासह प्रमुख ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत महसूलमंत्र्यांनी संबंधित गावातील एकूण ४ हजार ७१८ हेक्टर जमीन तेथील शेतकऱ्यांच्या नावावर हस्तांतरित करून त्यांना ‘वर्ग १’ धारणाधिकाराने प्रत्यक्ष ताबा देण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच या जमिनींच्या हस्तांतरणात वनविभाग आणि खासगी वन आरक्षणामुळे ज्या कायदेशीर व तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्या त्वरित दूर करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, गेळे येथील २६९ कुटुंबांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली असून त्यापैकी २५३ पात्र कुटुंबांना व्यावसायिक प्रयोजनासाठी भूखंड वाटप करण्याचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय चौकुळ, नेने आणि मासुरे या गावांतील प्रकरणांमध्ये असलेल्या न्यायालयीन अडचणींवर कायदेशीर व सकारात्मक मार्ग काढण्याबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून, सर्व बाधित शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे.












