आज पाणी अडवा, उद्याची टंचाई टाळा!
सिंधुदुर्गात वनराई बंधारे, ‘जलतारा’ कामे सुरू;
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
कमी आणि अनियमित पावसामुळे यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेतीवर पाणीटंचाईचे संकट ओढवले असून, अनेक भागांतील भातपिके करपली आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. सावंतवाडी तालुक्यातील डगवे ग्रामपंचायतीमध्ये वनराई बंधारा उभारणीच्या कामाचा तसेच ‘जलतारा’ उपक्रमांतर्गत जलसंधारणाच्या कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी डगवे परिसरातील करपलेल्या भातशेतीची प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भविष्यात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पावसाचे पाणी अडवून त्याचा योग्य विनियोग करण्यासाठी विविध जलसंधारणाच्या उपाययोजना राबविण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात वनराई बंधारे उभारणीला गती देण्यात येत आहे.
पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे तसेच शेती आणि स्थानिक पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध जलसाठा वाढविण्याच्या दृष्टीने वनराई बंधारे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून जिल्ह्यात अधिकाधिक वनराई बंधारे उभारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे कामत यांनी सांगितले.
“आज पाणी अडविले तर उद्याची पाणीटंचाई टाळता येईल. जलसंधारण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून त्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे,” असे सांगत नागरिकांनी जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रमोद कामत यांनी केले.
डेगवे ग्रामपंचायतीमध्ये ‘जलतारा’ उपक्रमांतर्गत जलसंधारणाच्या विविध कामांनाही सुरुवात करण्यात आली. या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढविण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी गावपातळीवर नियोजन करण्यात येणार आहे, कमी पर्जन्यमानामुळे डगवे परिसरातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्याअभावी करपलेल्या भातपिकाची कामत यांनी शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी पीक नुकसानीची माहिती जाणून घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती देत आपल्या अडचणी मांडल्या.शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. निर्माण झालेल्या या कठीण परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही प्रमोद कामत यांनी दिली. पीक नुकसानीची पाहणी करून त्याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासोबतच भविष्यात अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजनांना अधिक व्यापक स्वरूप देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्गमध्ये यंदा पावसाच्या अनियमिततेचा परिणाम शेतीसह जलस्रोतांवरही जाणवत आहे. त्यामुळे वनराई बंधारे, जलतारा आणि लोकसहभागातून जलसंधारणाची कामे हाच भविष्यातील पाणी सुरक्षिततेचा महत्त्वाचा आधार ठरणार असल्याचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी यांनी स्पष्ट करत पाणीटंचाई टाळण्यासाठी या कामात लोक चळवळ उभी रहावी असे आवाहन त्यांनी केले.








