समुद्रात तुफान…..
किनाऱ्यावरील लोकांचे स्थलांतर
शासनाची रंगीत तालीम ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वी
विजयदुर्ग (प्रतिनिधी) : विजयदुर्ग बंदरात काल चक्रीवादळाचा तडाखा बसला. समुद्रातील छोट्या मोठ्या बोटी भरकटल्यामुळे बोटीवरील खलाशी भयभीत झाले. या चक्रीवादळाचा दाह किनाऱ्यावर असलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबाला बसल्याने शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मच्छीमारांच्या कुटुंबांना विजयदुर्ग मराठी शाळेमध्ये सुरक्षित ठिकाणी हलवलं. दरम्यान, बोटीवरील खलाशांना वाचविण्यासाठी गावातील मच्छीमार बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता समुद्रात उड्या घेतल्या आणि प्राथमिक पद्धतीने उपचार करून त्यांना वाचवले.
जर अशा पद्धतीची आपत्ती निर्माण झाली तर नक्की काय करता येईल याचे प्रात्यक्षिक काल विजयदुर्ग बंदरामध्ये यशस्वीपणे पार पडलं. देवगड तहसीलदार शितल जाधव, विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी अमोल वारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. भोसले, पोलीस पाटील राकेश पाटील तसेच सर्व विभागातील शासकीय अधिकारी या सर्वांच्या सहकार्याने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यांची संयुक्त बहुराज्य चक्रीवादळ रंगीत तालीम यशस्वी झाली.
दरम्यान, एनडीआरएफच्या अधिकाऱ्यानी उपस्थिताना माहिती देताना अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर स्थानिकानी प्राथमिक परिस्थिती कशाप्रकारे हाताळली पाहिजे याचं योग्य मार्गदर्शन केलं लाईफ जॅकेट नसेल तर बॉटल बेल्टच्या माध्यमातून जवळपास तीन दिवस माणूस समुद्रात तरंगत राहू शकतो याचे प्रात्यक्षिकही या अधिकाऱ्यांनी दाखवलं. देवगड तहसीलदार शितल जाधव यांनीही ग्रामस्थांना सूचना करताना वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर घाबरून न जाता कसं सामोरं जायचं याचे योग्य विवेचन केले. मात्र फक्त मार्गदर्शन न करता बुडताना वाचविण्याचे प्रत्यक्षिक, किनाऱ्यावर नागरिकांचे स्थलांतर, त्यांची जेवणाची व्यवस्था, तातडीची आरोग्य तपासणी आदी बाबीतून ही रंगीत तालीम रंगीत तालीम न वाटता प्रत्यक्षात अशी घटना घडल्याचे वास्तव उभे राहिले. अर्थात सर्व विभागातील शासकीय अधिकाऱ्यांसोबत ग्रामस्थांचाही मोठा सहभाग होता ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे विजयदुर्ग भागात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर शासकीय यंत्रणा उपलब्ध होईपर्यंत ग्रामस्थ प्राथमिक स्वरूपात ही घटना चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणतील असा विश्वास तहसीलदार शितल जाधव यांनी व्यक्त केला.









