भरणे जाधववाडीत दुचाकी अपघात; श्रेया कदम यांची जखमीला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत

खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे जाधववाडी येथे बुधवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात राजन नरेंद्र देसाई (वय २३) हा तरुण जखमी झाला. महामार्गावरून चुकीच्या दिशेने येत असलेली युनिकॉर्न कंपनीची दुचाकी (क्रमांक एमएच ०८ एयू ६८६७) अपघातग्रस्त झाली. दुचाकी चुकीच्या दिशेने येत असल्याचे सांगण्यात येत असले, तरी अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या मार्गावरून जात असताना तालुक्यातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत असलेल्या सौ. श्रेया योगेश कदम यांच्या निदर्शनास हा अपघात आला. अपघाताची परिस्थिती पाहताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेची व्यवस्था करून जखमी राजन देसाई याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.
यावेळी केवळ मदतीची व्यवस्था करून न थांबता श्रेया कदम यांनी स्वतः रुग्णवाहिकेसोबत कळंबणी उपजिल्हा रुग्णालय गाठले. तेथील वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांची भेट घेऊन जखमी तरुणाला तातडीने आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. अपघाताच्या प्रसंगी त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास हातभार लागला.
आमदार योगेश कदम आणि शिवसेना नेते रामदास भाई कदम यांच्या मार्गदर्शनातून समाजकारणाला प्राधान्य देत श्रेया कदम यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपली. राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे असल्याचा संदेश त्यांच्या कृतीतून अधोरेखित झाला.
‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ ही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण प्रत्यक्ष कृतीतून जपण्याचे काम त्यांनी केले. अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीसाठी तातडीने धावून जात त्यांनी माणुसकी आणि लोकसेवेचे दर्शन घडवले.