चौकुळच्या कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नावर मुंबईत सकारात्मक चर्चा

महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रश्न मार्गी लावण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना

सावंतवाडी । प्रतिनिधी : 

चौकुळ गावातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नावर तातडीने मार्ग काढण्यासाठी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे व आमदार दीपक केसरकर आणि चौकूळ कबुलायदर गावकर जमीन व्यवस्थापन समिती यांच्या समवेत मुंबई येथे काल दि. ३० सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक झाली.चौकुळ गावचा कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न सन १९९९ पासून प्रलंबित असून, पुढील अधिवेशनापूर्वी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत महसूल मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

या बैठकीला चौकुळ गावचे जाणते सोनू गावडे, भिकाजी आप्पा गावडे( पप्पू गावडे,) गावकर बापू गावडे, जमीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश गावडे, सचिव विजय गावडे, चौकुळ ग्रामस्थ मुंबई संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर गावडे पदाधिकारी श्यामचरण गावडे, ज्ञानेश्वर गावडे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. श्री. सुनीलभाई गावडे, चौकुळ ग्रामस्थ संतोष गावडे, आदी उपस्थित होते.

तसेच यावेळी महसूल मंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कोकण आयुक्त, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच सावंतवाडी वनविभाग व वनविभागाचे कोल्हापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि नागपूर वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून जमीन प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत आवश्यक सूचना केल्या.

या बैठकीत आमदार दीपकभाई केसरकर यांनी चौकुळ कबुलायतदार गावकर जमीन चौकुळ ग्रामस्थांना पूर्वीप्रमाणेच भोगवटा वर्ग-१ मालकी हक्काने मिळावी, अशी चौकुळ ग्रामस्थांची मागणी आहे व त्यांचा तो अधिकार देखील आहे अशी ठाम भूमिका महसूलमंत्र्यांसमोर मांडली ,त्यावर महसूल मंत्र्यांनी उपस्थित जिल्हाधिकाऱ्यांकडून कागदपत्रांबाबत माहिती घेऊन चौकुळ ग्रामस्थांना भोगवटा वर्ग-१ प्रमाणे कायम मालकी हक्काने जमीन देणार असल्याचे सांगण्यात आले.

 

तसेच कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नासंदर्भात आमदार माननीय दीपक भाई केसरकर तसेच जमीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सचिव आणि ज्येष्ठ वकील सुनील गावडे यांनी महसूल न्यायाधिकरण, मुंबई (MRT) यांच्याकडे प्रलंबित असलेला वाद लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या निदर्शनास हा विषय आणून दिला त्यावर महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी महसूल विभाग तसेच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून महसूल न्यायाधिकरणाकडील वाद तातडीने निकाली काढण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत

 

दरम्यान, आंबोली अथवा गेळे गावातील ग्रामस्थ बैठकीस उपस्थित नसले तरी महसूल अधिकाऱ्यांनी गेळे गावाचा प्रश्न निकाली काढला असल्याची माहिती बैठकीत दिली, मात्र वनक्षेत्राबाबतचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे त्याचप्रमाणे चौकुळ कबुलायतदार गावकर जमिनीची मोजणी प्रलंबित असल्याचेही सांगितले

चौकुळ कबुलायतदार गावकर जमिनीची प्रलंबित मोजणी तातडीने पूर्ण करून संबंधित ग्रामस्थांच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लावून त्या गावकऱ्यांच्या नावावर भोगवटा वर्ग-१नुसार जमीन करून देणार असल्याचे उपस्थित सदस्यांना माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासित केले आहे.

 

या बैठकीमध्ये माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत आमदार दीपक केसरकर आणि चौकुळ कबुलायतदार गावकर जमीन व्यवस्थापन समिती सदस्य यांची सकारात्मक चर्चा झाली असून चौकुळ गावचा कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न तातडीने मार्गी लागणार आहे.