पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जनावरे खरेदीसाठी शेतकऱ्यांना मदत करणार
जिल्ह्यात एक लाख लिटर दूध संकलनाचा जिल्हा बँकेचा संकल्प
आचिर्णे येथे पशुपालक शेतकरी मेळावा संपन्न : मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित
वैभववाडी l प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न शेती आणि शेतीपूरक व्यवसायातूनच वाढू शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दररोज एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेने ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असणारे आर्थिक सहाय्य बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुरत्न योजनेतूनही शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक दिलीप रावराणे यांनी केले.
आचिर्णे येथे किसान गोष्टी अंतर्गत कलिंगड लागवड मार्गदर्शन व पशुपालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विभाग आत्मा, पंचायत समिती वैभववाडी आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, जिल्हा बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, गोकुळ दूध संघ कोल्हापूरचे प्राचार्य एम. पी. पाटील, मालवण येथील प्रगतशील शेतकरी सुरेश मापारी, आत्मा सिंधुदुर्गच्या प्रकल्प उपसंचालक प्रगती तावरे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, जिल्हा परिषद सदस्य रिद्धी सुतार, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, आत्मा अध्यक्ष मंगेश कदम, जयसिंग रावराणे, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने, गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, महेश संसारे, उत्तम सुतार आदी उपस्थित होते.
दिलीप रावराणे म्हणाले, तालुका आत्मा समितीचे काम नियोजनबद्ध सुरू असून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून एक हजार दुधाळ जनावरे खरेदी करण्याचे नियोजन आहे. तसेच सिंधुरत्न योजनेतून पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने जनावरे खरेदीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला २० हजार रुपयांची मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सभापती सिद्धेश रावराणे म्हणाले, शेतीपूरक व्यवसायांमध्ये महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीमध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची असते. कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी महिलांचे सहकार्य अपेक्षित आहे. तसेच शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध शासकीय योजनांचाही लाभ घ्यावा.
गोकुळ दूध संघाचे प्राचार्य एम. पी. पाटील यांनी दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचा उत्तम पर्याय असल्याचे सांगितले. दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी गोकुळ संघ खंबीरपणे उभा आहे. संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ३२ विविध योजना उपलब्ध असून, तळकोकणात दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रगतशील शेतकरी सुरेश मापारी यांनी कलिंगड लागवड, पीक व्यवस्थापन आणि नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. कलिंगड हे चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक असून, एका एकरात सुमारे चार हजार रोपांची लागवड करता येते. कलिंगडासाठी स्थानिक बाजारपेठही उपलब्ध आहे. कलिंगड लागवडीबरोबरच प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक गाय पाळण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंगेश कदम, प्रमेश वाघ, महेश संसारे आणि जिल्हा बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कृषी सहाय्यक बालाजी वाघमोडे यांनी मानले.













