राष्ट्रीय पोषण माहानिमित्त जामसांडे येथे कार्यक्रम; सकस आहार प्रदर्शनातून पालकांचे प्रबोधन
समुदायाच्या सहभागातून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन
देवगड : राष्ट्रीय पोषण माहानिमित्त देवगड बीटच्या वतीने टिळक नगर अंगणवाडी, जामसांडे येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ‘राष्ट्रीय पोषण माह अभियान ’व ‘सेवा संकल्प अभियान’ हा उपक्रम राबविण्यात आला, त्याअंतर्गत आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करण्यात आला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग नागरी महिला व बालविकास प्रकल्पाच्या मुख्य सेविका कल्पना आंबवले या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी देवगड-जामसांडे हद्दीतील सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा स्वयंसेविका, गरोदर माता, स्तनदा माता ,पालक आणि बालकांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय पोषण माहानिमित्त सकस आहार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनामध्ये विविध पौष्टिक खाद्यपदार्थ मांडण्यात आले होते. बालकांच्या निरोगी वाढीसाठी आवश्यक असलेल्या पोषक आहाराची माहिती पालकांना देण्यात आली. संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देत पालक तसेच नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.
आहारातील विविधता आणि प्रथिनयुक्त आहारावर भर
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्य सेविका कल्पना आंबवले यांनी बालकांच्या आरोग्यपूर्ण वाढीसाठी आहारातील विविधता महत्त्वाची असल्याचे सांगितले. बालकांना केवळ पोट भरणारा आहार न देता प्रथिने आणि आवश्यक पोषक घटक असलेला संतुलित आहार देणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना ताजे व गरम शिजवलेले जेवण मिळणे आवश्यक आहे. बालकांच्या आहाराची गुणवत्ता आणि पोषणमूल्य याकडे अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच पालकांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
पोषणासोबत बुद्धीला चालना देणेही गरजेचे
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पोषण पुरेसे नसून त्यांच्या बुद्धीला चालना देणारे उपक्रमही आवश्यक आहेत. खेळ, संवाद, विविध कृती आणि शिकण्याच्या संधी यामुळे बालकांच्या बौद्धिक विकासाला मदत होते, असे कल्पना आंबवले यांनी सांगितले.
बालकांचे आरोग्य आणि पोषण ही केवळ अंगणवाडीची जबाबदारी नसून पालक, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आशा स्वयंसेविका आणि संपूर्ण समाजाची एकत्रित जबाबदारी आहे. समुदायाने या कार्यात सक्रिय सहभाग घेतल्यास बालकांच्या सर्वांगीण विकासाला अधिक चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेबाबतही जनजागृती करण्यात आली. पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि योजनेची माहिती गरजू महिलांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले.
राष्ट्रीय पोषण माहाच्या माध्यमातून बालकांचे पोषण, आरोग्य आणि सर्वांगीण विकास याबाबत जनजागृती करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. पालकांनी बालकांच्या आहाराकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्या निरोगी आणि सक्षम भविष्यासाठी पोषणाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार सोनाली जाधव यांनी मानले. अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा स्वयंसेविका, पालक आणि बालकांच्या सहभागाने कार्यक्रम उत्साहात पार पडला.












