स्वच्छता केवळ अभियानापुरती नाही तर वर्षाच्या बाराही महिने राबवून राजापूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्प राजापूर नगर परिषद विशेष सर्वसाधारण सभा

राजापूर प्रतिनिधी : स्वच्छता ही सेवा-२०२६ अभियान केवळ अभियापुरते न राबविता वर्षाचे बाराही महिने हे अभियात राबवून राजापूर शहर स्वच्छा आणि सुंदर ठेवण्याचा संकल्प शुक्रवारी झालेल्या राजापूर नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत करण्यात आला. या अभियानांतर्गत राजापूर शहरात राबविण्यात आलेल्या विविध स्वच्छता उपक्रमांचा आढावा घेताना भविष्यात स्वच्छतेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
स्वच्छता ही सेवा-२०२६ अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, या कालावधीत “स्वच्छता ही सेवा-२०२६” अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानांतर्गतच या कालावधीत नगर परिषद कौन्सीलच्या विशेष सभेचे आयोजन करून अभियानाबाबत आढावा घेण्यात आला. नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरात या अभियान कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. तर शुक्रवारी २ ऑक्टोबर रोजी या अभियानाची सांगता झाली. यावेळी बोलताना एड. खलिफे यांनी हे अभियान केवळ अभियानापुरते मर्यादित असून वर्षाच्या बाराही महिने स्वच्छ राजापूर सुंदर राजापूरचा नारा देत आपण प्रत्येकाने काम करूया असे आवाहन केले.
यावेळी प्रशासनाने या अभियानांतर्गत राबविलेल्या उपक्रमांची माहिती कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव व सुप्रिया गोडेकर यांनी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत उपनगराध्यक्ष विनय गुरव, एड. जमिर खलिफे, सुलतान ठाकूर, सौरभ खडपे, सिध्दांता जाधव, सौरभ पेणकर, महेश शिवलकर, शबाना मुल्ला, जान्हवी वादक, प्रेरणा नार्वेकर, नेहा तानडवे, अमिना गडकरी, साजिया काझी, सुयोगा जठार, सान्वी रावण आदींनी सहभाग घेत आपली मते मांडली.
यावेळी पाणीपुरवठा वाहिन्यांचे काम करताना होत असलेल्या रस्त्यांच्या खोदकामांमुळे रस्त्यांची दुरावस्था होत असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला. यावर पाणीपुरवठा विभागाच्या एकूणच कामकाजाबाबत तसेच टंचाई काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत आढावा घेऊन निर्णय घेण्यासाठी मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी विशेष बैठक आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.