नाटे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी: घरफोडीचे तीन वेगवेगळे गुन्हे उघडकीस; सर्व प्रकरणांतील आरोपी गजाआड, चोरीचा मुद्देमाल हस्तगत

जैतापूर वार्ताहर : राजापूर तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बंद घरे फोडून लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम पळवणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात नाटे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि कौतुकास्पद तपास मोहीम राबवून एकापाठोपाठ घडलेले घरफोडीचे तीन वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणले आहेत. विशेष म्हणजे, या तिन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या संबंधित आरोपींना वेगवेगळ्या कारवाईत जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल यशस्वीरीत्या हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, नाटे पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे.
नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांत घरफोडीच्या तीन मोठ्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. यामध्ये भालावली, वरचा भंडारवाडा येथील शेतकरी विश्वास महादेव भोसले यांच्या बंद घराची कडी काढून अज्ञात चोरट्यांनी कपाटातून १ लाख ७० हजार रुपये किमतीची सोन्याची चपटी चैन लंपास केली होती. त्यानंतर नाटे येथील ‘यश होम स्टे’च्या पाठीमागे राहणारे सुपरवायझर रोशन मोठाभाऊ बच्छाव हे नेहमीप्रमाणे कामावर गेले असता, त्यांच्या भाड्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याची गोफ चैन, अंगठी, चांदीचे दागिने आणि ५०० रुपयांच्या नोटांचे एक लाख रुपये रोख असा सुमारे २ लाख १९ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला होता. तसेच नाणार भटवाडी येथील सेवानिवृत्त सिस्टर लता वासुदेव साईम या कामानिमित्त बाहेर गेल्या असता, त्यांच्या घराचे मुख्य कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील चांदीची पूजेची भांडी व साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते.
एकापाठोपाठ घडलेल्या या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन नाटे पोलिसांनी गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे एकाच वेळी वेगवेगळ्या दिशांनी तपासाची चक्रे गतिमान केली. पोलिसांनी अत्यंत चिकाटीने माग काढून तिन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यांतील आरोपींना बेड्या ठोकल्या. यामध्ये नाणार येथील घरफोडीप्रकरणी बीड जिल्ह्यातील कासारी (ता. आष्टी) येथील सराईत चोरटे संजय उर्फ मोहन निकाजा भोसले आणि नितेश उर्फ संतोष मरदान भोसले यांना जेरबंद करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्यात पोलीस कॉन्स्टेबल निखिल माने हे अधिक तपास करीत आहेत. उर्वरित दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींचाही पोलिसांनी माग काढून त्यांना गजाआड केले आहे. या तिन्ही प्रकरणांतील आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदरची धडक आणि कौतुकास्पद कामगिरी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच लांजा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत नाटे सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली नाटे पोलीस ठाण्यातील सर्व अंमलदार व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र विशेष मेहनत घेऊन हे क्लिष्ट गुन्हे उघडकीस आणले. गुन्हेगारांना गजाआड करून नागरिकांचा कष्टाचा ऐवज परत मिळवून दिल्याबद्दल नाटे सागरी पोलीस पथकाचे राजापूर परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातून विशेष अभिनंदन केले जात आहे.