प्रशासनाची सज्जता झाली सिद्ध..

वेंगुर्ले : दाजी नाईक
निसर्गाच्या संभाव्य चक्रीवादळाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता तपासण्यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील शेळपी (किल्ले निवती) आणि श्रीरामवाडी येथे प्रशासनातर्फे चक्रीवादळ आपत्कालीन रंगीत तालीम (मॉक ड्रिल) यशस्वीपणे पार पडली.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी (महसूल) वीरसिंग वसावे, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, तहसीलदार ओंकार ओतारी, उपविभागीय अधिकारी (पोलीस), सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, मेढा सरपंच अवधूत रेगे यांच्यासह स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, महावितरण, SDRF, NDRF, मत्स्य व्यवसाय विभाग, बंदर विभाग, आरटीओ, एसटी महामंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेळपी (किल्ले निवती) येथे सकाळी ९:२२ वाजता चक्रीवादळाचा इशारा मिळताच पीए सिस्टीम व पोलीस व्हॅनच्या सायरनद्वारे ग्रामस्थांना सतर्क करण्यात आले. ४० महिला, २० पुरुष व १० बालके अशा एकूण ७० नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी (प्राथमिक शाळा) स्थलांतरित करण्यात आले. समुद्रात अडकलेल्या एका व्यक्तीची मत्स्यविभागाच्या मदतीने, तर छोटी होडी उलटून बुडालेल्या ३ मच्छिमारांची एन डी आर एफ पथकाद्वारे सुरक्षित सुटका करण्यात आली. तसेच हॉटेल व घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांना अग्निशामक दलाने बाहेर काढले. तसेच गॅस सिलेंडरची लागलेली आग विझवण्यात आली. रस्त्यावर पडलेली झाडे वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने हटवून रस्ता मोकळा केला, तर महावितरणने पडलेली झाडे हटवून वीजपुरवठा सुरळीत केला. यावेळी भोगवे ग्रामपंचायत सरपंच अंकिता वायंगणकर, उपसरपंच रुपेश मुंड्ये, सदस्य, अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. पोलिस पाटील प्रतीक्षा मुंड्ये यांनी चांगली. व्यवस्था केली.
श्रीरामवाडी मध्ये सुद्धा सकाळी ९:१५ वाजता सूचना मिळताच ८० पुरुष, ५३ महिला व १७ मुले अशा १५० नागरिकांना प्राथमिक शाळा व श्रीराम मंदिर येथे सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले. समुद्रात बोट उलटून बुडणाऱ्या २ व्यक्तींना तसेच जेटीजवळ अडकलेल्या नागरिकांना NDRF च्या पथकाने सुरक्षित बाहेर काढून वैद्यकीय उपचारासाठी पाठवले.
घरात अडकलेल्या व्यक्तींची सुटका करणे, गॅस सिलेंडरची व शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग विझवणे आणि वीज वाहक तारांवरील झाडे हटवून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान जखमींना तात्काळ प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे जीएमसी ओरोस व प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्याचे नियोजनबद्ध प्रात्यक्षिक करण्यात आले.
या तालीमीच्या वेळी सावंतवाडीचे उपपोलीस अधीक्षक श्री. राजेश भागवत उपस्थित होते, तसेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती घोडमीसे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रंगीत तालीमीची पाहणी केली व प्रशासकीय यंत्रणेच्या तत्परतेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी मेढा सरपंच अवधूत रेगे, ग्रामसेवक शरद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ सहभागी झाले होते.











