मसुरे | झुंजार पेडणेकर
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ग्रामपंचायत तिरवडे येथे ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित जिल्हा परिषद सदस्या सौ. सुमेधा पाताडे, पंचायत समिती सदस्य श्री. संतोष गावडे, यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. रेश्मा गावडे, उपसरपंच श्री. सुशील गावडे,ग्रामपंचायत सदस्य श्री. सुमित मेस्त्री, श्री. विशाखा गावडे, ग्रामपंचायत अधिकारी एम. एस. पिळणकर, पोलीस पाटील संतोष जामसंडेकर तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच आरोग्याची काळजी, नियमित आरोग्य तपासणी, योग्य आहार, व्यायाम व निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव, संघर्ष आणि यशोगाथा उपस्थितांसमोर सांगितल्या. त्यांच्या अनुभवातून उपस्थितांना प्रेरणा मिळाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुमेधा पाताडे यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना त्यांच्या अनुभवाचे समाजासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, आरोग्य व सुरक्षितता याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवांचा आणि मार्गदर्शनाचा समाजाला मोठा फायदा होतो, त्यामुळे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रम उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला.













