वाघिवरे-वेलगिवे परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; तातडीने पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेशजी राणे साहेब यांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती मा. सौ. अनुराधा महेश नारकर यांनी वाघिवरे-वेलगिवे ग्रामपंचायत हद्दीतील भातशेतीच्या नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.
यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने भातशेतीला मोठा फटका बसला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील भातपीक करपून गेले असून, अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर सभापती सौ. अनुराधा नारकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची शासनाच्या माध्यमातून दखल घेतली जाईल आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन सभापती सौ. अनुराधा नारकर यांनी यावेळी दिले. थेट बांधावर येऊन पाहणी केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
यावेळी पंचायत समिती सदस्य समृद्धी चव्हाण, सरपंच श्री. राजन लाड, पाडगाव मंडल अधिकारी सौ. कुडलकर, ग्राम महसूल अधिकारी कु. राणे, श्री. धनावटे, सौ. मेस्त्री, ग्रामपंचायत अधिकारी श्री. यू. एस. मुल्लानी, माजी सरपंच सौ. सुप्रिया मांजरेकर, श्री. संतोष चव्हाण, पोलीस पाटील श्री. महेश लाड, श्री. श्रीराम नारकर, कृषी सहाय्यक श्री. नाकाडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि वाघिवरे-वेलगिवे परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











