बांदा-गोवा सीमेवर पत्रादेवी येथून दोन संशयितांना ठाणे क्राईम ब्रँचकडून अटक
बांदा : प्रतिनिधी
ठाण्यातील मानपाडा – मनोरमानगर परिसरातील शिवसेना (उबाठा) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे. या हत्येप्रकरणातील दोन मुख्य संशयित आरोपींच्या ठाणे क्राईम ब्रँचने बांदा-गोवा सीमेवरील पत्रादेवी येथून मुसक्या आवळल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिल यादव उर्फ भावड्या आणि नितेश पवार अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. हत्येच्या घटनेनंतर हे आरोपी गोव्याच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असताना ठाणे गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) पथकाने सापळा रचून पत्रादेवी तपासणी नाक्याजवळ त्यांना ताब्यात घेतले.
कारवाईच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पत्रादेवी परिसरातील सर्व बार आज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ठाण्यातील मानपाडा भागातील कार्यालयाबाहेर मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी बाळू पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला आणि धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, हत्येमागील मुख्य सूत्रधार आणि इतर ३ ते ४ संशयित आरोपींचा शोध पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके घेत आहेत.
संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर आता ठाण्यात आणले जात असून, या हत्येमागील नेमके कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.












