देवगड / प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील खाकशी तिठा येथील सिंधुदुर्ग सोशल स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये सुरू असलेल्या तीन पत्ती जुगारावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत रोख रकमेसह वाहने, मोबाईल, पत्ते, टेबल व खुर्च्छा असा एकूण सुमारे ४६ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एकूण १५ संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी काही जण प्रत्यक्ष तीन पत्ती जुगार खेळताना आढळून आले. तर काही जण जुगार खेळणाऱ्यांना मदत करण्यासाठी तसेच खेळासाठी तेथे उपस्थित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाकशी तिठा येथील सिंधुदुर्ग सोशल स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये तीन पत्ती जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तेथे छापा टाकला. यावेळी आदिनाथ संतोष परब (वय ३०, रा. जामसंडे, दीपक गुरुनाथ डगरे,) (वय ३२, रा. देवगड, प्रवीण रामचंद्र निबांळकर (वय-४०, रा. तळेबाजार), नाना शंकर राठोड (वय ३०, रा. पडेल कॅन्टीन), राजेंद्र चंद्रकांत कांबळे, (५१, रा. जामसंडे), सर्जेराव सावळा तांबे (वय ३४, रा. जामसंडे), योगेश विलास बाणे, (४२, रा. जामसंडे), परमेश्वर रघुनाथ शिंदे, (वय ३२, रा. जामसंडे), अशोक गंगाराम साळस्कर (वय-४५, रा. वरेरी), चरण सुभाष बाणे (वय-३१, रा. जामसडे), प्रकाश बाबला खरात (वय-४७, रा. तळेबाजार), संतोष गंगाराम साळस्कर (वय-४६, रा. लिंगडाळ तिठा), शार्दूल विश्वास कांबळे (वय-२८, रा. जामसंडे), संदीप जनार्दन मालणकर (वय-६०, रा. सध्या सिंधुदुर्ग सोशल स्पोर्टस अॅकेडमी देवगड, मूळ रा. गवाणे), विरेंद्र वासुदेव जाधव (५०, रा. वाडा) अशा एकूण १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. या सर्व संशयितांविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ मधील कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान सर्व संशयितांकडून एकूण ३ लाख ७४ हजार ३९० रुपयांची रोख रक्कम, तीन पत्ती खेळण्यासाठी वापरण्यात येणारे पत्ते, टेबल व खुर्च्छा जप्त केल्या. याशिवाय घटनास्थळी आणलेली विविध चारचाकी व दुचाकी वाहने तसेच मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या कारवाईमुळे देवगड परिसरात सुरू असलेल्या जुगाराच्या प्रकारांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस हवालदार डॉमनिक डिसोजा, पोलीस हवालदार भस्ताव डिसोजा, पोलीस हवालदार विल्सन डिसोजा, पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजीस्कर यांच्या पथकाने केली. या घटनेची फिर्याद स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार आशिष जामदार यांनी दिली. प्रकरणाचा पुढील तपास देवगडचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय खाडे करीत आहेत.












