वेंगुर्ले तालुकास्तरीय ‘वनराई बंधारा’ उपक्रमाचा मातोंड येथे शुभारंभ..

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेंगुर्ले पं. स. चे ठोस नियोजन : सभापती शंकर घारे 

तालुक्यात १००० वनराई बंधारे व ७५० जलतारा खड्डे खोदाई चे नियोजन…

वेंगुर्ले : दाजी नाईक 

संभाव्य पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संकटावर मात करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती वेंगुर्ला यांनी ठोस पावले उचलली आहेत. पंचायत समिती वेंगुर्ला आणि ग्रामपंचायत मातोंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय ‘वनराई बंधारा’ बांधणी उपक्रमाचा भव्य शुभारंभ मातोंड येथील झरी या ठिकाणी पार पडला. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून या बंधाऱ्याचे काम प्रत्यक्ष पूर्ण करून उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. दरम्यान संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेंगुर्ले पं. स. चे ठोस नियोजन करण्यात आले असून सर्व नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि पाणीसाठा वाढवण्यासाठी आपल्या भागात बंधारे बांधावेत असे आवाहन सभापती शंकर घारे यांनी केले आहे.

पाणी साठवणूक करणे आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी वनराई बंधारे अत्यंत प्रभावी व महत्त्वाचे ठरतात. या बंधाऱ्यामुळे मातोंड व परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून जमिनीत ओलावा टिकण्यास मोठी मदत होणार आहे. तालुक्यातील शेतकरी बांधव, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी आपापल्या क्षेत्रात जास्तीत जास्त वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याच्या या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी या प्रसंगी केले.

या तालुकास्तरीय कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यामध्ये पंचायत समिती सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, पंचायत समिती सदस्या सुचिता वजराटकर, संकेत धुरी, तसेच मातोंडच्या सरपंच मयुरी वडाचेपाटकर आदी मान्यवरांचा समावेश होता.

याशिवाय कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे, तालुका पशु संवर्धन अधिकारी विद्यानंद देसाई, ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी प्रफुल्लकुमार शिंदे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रीतम पवार, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, कृषी विस्तार अधिकारी सुप्रिया कोरगावकर, मुख्यसेविका शर्मिष्ठा सामंत, गीता परब, उमेद अभियान तालुका समन्वयक अमोल कावले, मंडळ कृषी अधिकारी शंकर नाईक, केंद्रप्रमुख उत्तम पाटील,सागर आवळेगावकर, जि.प.शाळा मातोंड नंबर ५ च्या मुख्याध्यापिका आयुषा झेंडे, मातोंड उपसरपंच वैभवी परब, ग्रामपंचायत अधिकारी प्रल्हाद इंगळे, माजी सरपंच जान्हवी परब, माजी उपसरपंच आनंद परब, ग्रामपंचायत सदस्या किशोरी परब, सुजाता सावंत यांच्यासह न्यू इंग्लिश स्कूल मातोंड चे शिक्षक वृंद,विद्यार्थी ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ , पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलसंधारणाचा संदेश देत स्थानिक पातळीवर पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्यासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमासोबतच विकसित भारत जीरामजी योजने अंतर्गत जास्तीत जास्त जलतारा खड्डे खोदाई करून जलसंवर्धन करावे असे आवाहन गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी केले. आपल्या तालुक्यात १००० वनराई बंधारे व ७५० जलतारा खड्डे खोदाई चे नियोजन करण्यात आलेले असून त्या कामी सर्व ग्रामपंचायती व नागरिक, शेतकरी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपसभापती सचिन देसाई यांनी केले .उपस्थितांचे आभार प्रल्हाद इंगळे यांनी मानले.