मसुरे | झुंजार पेडणेकर : ग्रामपंचायत कार्यालय वडाचापाट येथे ग्रामपंचायतीच्या वतीने महिला शेतकरी सन्मान कार्ड कॅम्प तसेच आयुष्मान मंदिर, माळगाव यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई, उपसरपंच श्री. सचिन पाताडे, सीएचओ भक्ती परब, माजी मालवण पंचायत समिती सभापती श्री. राजेंद्र प्रभुदेसाई, युवा उद्योजक श्री. दयानंद प्रभुदेसाई, ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण सरमळकर, बचत गटाच्या पालव मॅडम, सुमित सावंत उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला .
या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला शेतकरी सन्मान कार्ड कॅम्पमध्ये सुमारे ८० ते १०० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
महिलांना शेतकरी म्हणून आवश्यक कागदपत्रे, विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच शेतकरी म्हणून उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. त्याचबरोबर सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित आरोग्य शिबिरामध्ये महिलांसह ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला सक्षमीकरणासोबतच आरोग्य जनजागृतीचा संदेश देणारा हा उपक्रम वडाचापाट ग्रामस्थांसाठी उपयुक्त ठरला.












