खेड आगारात डिजिटल मशीन अभावी वेळापत्रक कोलमडले

खेड (प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यात एस टीच्या नवीन डिजिटल मशीनचे मोठ्या थाटात वितरण करण्यात आले. रत्नागिरी विभागातील नऊ पैकी आठ आगारात नवीन मशीनवर काम सुरू करण्यात आले, मात्र महामंडळाला लाखोंचे उत्पन्न देणाऱ्या खेड आगारात अद्याप नवीन मशिन सुरू करण्यात न आल्याने येथील आगाराचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून संपूर्ण राज्यात नवीन तिकीट प्रणाली सुरू करण्यात आली. जुन्या मशिन्स कालबाह्य झाल्याने आणि सतत बंद पडत असल्याने वाहकही बेजार झाले आहेत. पर्यायाने येथील आगारातील सर्व गाड्या उशिराने धावत असल्याने आगाराच्या उत्पन्नावर याचा परिणाम होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही ९ आगारात ही प्रणाली सुरू करण्याचे काम सुरू झाले, रत्नागिरी, राजापूर, लांजा, देवरुख, गुहागर, चिपळूण, दापोलि, मंडणगड या आगारात नवीन मशीनवर सेवा सुरू करण्यात आली. मात्र खेड आगारात दोन महिन्यांपूर्वी मशिन्स येऊन पडल्या असून अध्याप त्या सुरू करण्याबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.
नवीन मशीन सुरू न झाल्याने जुन्या मशिनवरच वाहकांना आपले काम करावे लागत आहे. त्याही मधेच बंद पडत असल्याने वाहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तर कमी मशिन्स मुळे दैनंदिन वाहतूक विस्कळीत झाली असून आगारातील वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. सध्या गणेशोउत्सव तोंडावर आल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असते, त्यामुळे विभागनियंत्रक श्री. प्रज्ञेश बोरसे यांनी तातडीने लक्ष घालून मशिन्स सुरू करून देण्याची मागणी प्रवासी संघटना करत आहेत.