रत्नागिरीत ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान श्री दुर्गामाता दौड; शहरातील विविध मार्गांवरून धावणार शिवभक्त

रत्नागिरी : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी यांच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘श्री दुर्गामाता दौड २०२६’ या सांस्कृतिक व राष्ट्रभक्तीपर उपक्रमाचे यंदा १५ वे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेतून, श्री तुळजाभवानीच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही दौड आयोजित करण्यात आली आहे. दररोज सकाळी दौड काढण्यात येणार असून, सहभागी होण्याचे मुख्य ठिकाण मारुती मंदिर सर्कल, शिवतीर्थ, रत्नागिरी आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये देशभक्ती, राष्ट्राभिमान, धर्म व संस्कृतीविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच शिस्त, संघटन आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आयोजकांच्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी मारुती मंदिर ते माळनाका, के.सी. जैन नगर, एकता मार्ग आणि पुन्हा मारुती मंदिर असा दौड मार्ग राहणार आहे. या दिवशी श्री व्याघ्रेश्वरी अंबा माता मंदिराचा नवरात्र मंडळ सहभाग राहणार आहे.

१२ ऑक्टोबरला मारुती मंदिरातून मजगाव रोड, चर्मालय, क्रांतिनगर, कोकणनगर, चर्मालय मार्गे पुन्हा मारुती मंदिर असा मार्ग निश्चित करण्यात आला असून, महापुरुष मित्र मंडळ व क्रांतिनगर नवरात्र उत्सव मंडळ सहभागी होणार आहे.

१३ ऑक्टोबरला मारुती मंदिर–माळनाका–मेटल हॉस्पिटल रोड–जेल रोड–माळनाका–मारुती मंदिर या मार्गावर दौड होईल. यावेळी महापुरुष बाल मित्रमंडळ, पोलीस महापुरुष तरुण मित्रमंडळ आदींचा सहभाग राहणार आहे.

१४ ऑक्टोबरला मारुती मंदिर–दामले शाळा रोड–पॉवर हाऊस–विश्वनगर–पॉलिटेक्निकल रोड–मारुती मंदिर असा मार्ग राहणार आहे. या दिवशी विश्वनगर मित्रमंडळ सहभागी होणार आहे.

१५ ऑक्टोबरला मारुती मंदिर–माळनाका–सन्मित्रनगर–तारांगण रोड–माळनाका–मारुती मंदिर या मार्गावर दौड होणार असून, आई माऊली मित्रमंडळ व सन्मित्रनगर येथील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

१६ ऑक्टोबरला मारुती मंदिर–माळनाका–हिंदू कॉलनी रोड–थिबा पॅलेस रोड–हिंदू कॉलनी रोड–मारुती मंदिर असा दौड मार्ग राहणार आहे. यावेळी थिबा पॅलेस रोड मित्र मंडळाचा सहभाग राहील.

१७ ऑक्टोबरला मारुती मंदिरातून अभ्युदयनगर–नाचणे रोड–साळवी स्टॉप–शिवाजीनगर–मारुती मंदिर असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या दिवशी श्री नवलाई देवी मंदिराच्या नवरात्र मंडळाचा सहभाग राहणार आहे.

यानंतर १८ ऑक्टोबरला दौडचे ठिकाण तेलीआळी नाका, पारासजवळील श्री महालक्ष्मी देवी मंदिर येथे राहणार आहे. तेलीआळी नाका–पंचायती आळी–विठ्ठल मंदिर–चिटक आळी–गणपती मंदिर–जोगेश्वरी मंदिर–झाडगाव नाका–श्री देव भैरी सहाण–शेरनाका–लक्ष्मी चौक–मारुती आळी–तेलीआळी नाका असा दौड मार्ग असणार आहे. या दिवशी श्री जोगेश्वरी मंदिर नवरात्र मंडळ सहभागी होणार आहे.

१९ ऑक्टोबरला तेलीआळी नाका–मांडवी नाका–घुडेवघर–दत्त मंदिर–तेलीआळी नाका असा दौड मार्ग राहणार असून, जय भैरव नवरात्र मंडळ आणि तेलीआळी मंडळाचा सहभाग राहणार आहे.

२० ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी पुन्हा मारुती मंदिर सर्कल, शिवतीर्थ येथून दौड काढण्यात येणार आहे. मारुती मंदिरातून दुचाकीवरून वळण, मांडवी रोड, किल्ला आणि त्यानंतर दौड मार्गाने भगवती मंदिरापर्यंत हा उपक्रम होणार आहे. या दिवशी श्री भगवती देवी मंदिर, किल्ला रत्नदुर्ग येथील नवरात्र मंडळ सहभागी होणार आहे.

श्री दुर्गामाता दौड हा केवळ धावण्याचा उपक्रम नसून, देव, देश आणि धर्मरक्षणासह राष्ट्र, संस्कृती आणि स्वाभिमानाच्या विचारांना जागृत करणारा उपक्रम असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. हिंदू समाजातील तरुणांनी संघटित होऊन देश आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सज्ज व्हावे, या उद्देशाने या दौडीचे आयोजन केले जाते.

या उपक्रमात रत्नागिरी शहरातील नागरिक, तरुण, विविध नवरात्र मंडळे आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क : देवेंद्र झापडेकर – 7020024242, गौरव सावंत – 7057395969, अक्षत सावंत – 9921116389, जयदीप साळवी – 9922429577.