आरटीओ कार्यालयाकडून दुचाकी वाहनांसाठी ‘MH-08-BP’ ही नवीन मालिका सुरू; आकर्षक व पसंतीचे क्रमांक मिळवण्याची संधी

रत्नागिरी : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका ‘MH-08-BP-0001 ते MH-08-BP-9999’ दिनांक ०६ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यात येत आहे. या नव्या मालिकेतील आकर्षक आणि पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळवण्यासाठी वाहनधारकांसाठी अर्ज व लिलाव प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा तसेच कार्यालयीन व्यवस्थेवर ताण न पडता इच्छुकांना पसंतीचा क्रमांक सुलभतेने मिळावा, यासाठी ही विशेष कार्यपद्धती राबविण्यात येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली आहे.
अर्ज प्रक्रिया व लिलावाचे वेळापत्रक:
चारचाकी व इतर परिवहन वाहनांसाठी (तीनपट शुल्क भरून):
अर्ज सादर करणे: ज्या चारचाकी अथवा इतर परिवहन वाहनधारकांना या नव्या दुचाकी मालिकेतील पसंतीचा क्रमांक हवा असेल, त्यांनी तीनपट शुल्क भरून ०६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
यादी प्रसिद्धी: प्राप्त अर्जांची यादी त्याच दिवशी सायंकाळी ०३:०० वाजता कार्यालयीन नोटीसबोर्डवर प्रसिद्ध केली जाईल.
लिलाव प्रक्रिया: एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास, अर्जदारांनी लिलावासाठी जादा रकमेचा डीडी सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात जमा करावा. त्यानंतर सायंकाळी ०४:३० वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत संबंधितांसमोर लिफाफे उघडून सर्वाधिक रकमेचा डीडी सादर करणाऱ्या अर्जदारास तो क्रमांक वितरीत केला जाईल.
दुचाकी वाहनांसाठी उर्वरित आकर्षक क्रमांक:
अर्ज सादर करणे: दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक क्रमांकांसाठी ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत अर्ज स्वीकारले जातील.
यादी प्रसिद्धी: प्राप्त अर्जांची यादी ०७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०३:०० वाजता नोटीसबोर्डवर लावली जाईल.
लिलाव प्रक्रिया: एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक दावेदार असल्यास, जादा रकमेचा डीडी सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात जमा करावा लागेल व सायंकाळी ०४:३० वाजता लिलाव पद्धतीने सर्वाधिक बोली लावणाऱ्या अर्जदारास क्रमांक देण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे व नियम:
१. कागदपत्रे: अर्ज कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्ड, वैध ओळख पुरावा यांच्या साक्षांकित प्रती आणि विहित शुल्काचा डीडी यांसह सादर करणे आवश्यक आहे.
२. डीडी कोणाच्या नावे असावा: डीडी राष्ट्रीयीकृत किंवा शेड्युल्ड बँकेचा ‘DY RTO RATNAGIRI’ यांच्या नावे आणि रत्नागिरी येथे देय असावा.
३. मुदत व अटी: एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून दिला जाणार नाही. क्रमांक आरक्षित केल्याच्या दिनांकापासून १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास आरक्षित केलेला क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क शासनजमा होईल. कोणत्याही परिस्थितीत जमा केलेले शुल्क परत अथवा समायोजित केले जाणार नाही.