दोघांचं प्रेम लपवण्यासाठी तिसऱ्याचा बळी?

१७ वर्षीय साहिलच्या आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा; बदनामी आणि मानसिक छळाचा आरोप, मृत्यूपूर्वीची चिठ्ठी तपासातील महत्त्वाचा पुरावा

चिपळूण:

चिपळूण तालुक्यातील वहाळ घडशीवाडी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेला आता गंभीर वळण मिळाले आहे. साहिल सुरेश भागडे या अल्पवयीन मुलाच्या मृत्यूप्रकरणी एकाच गावातील तीन व्यक्तींविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिलला कथित मानसिक त्रास देणे, त्याची बदनामी करणे आणि त्याच्यावर दबाव आणल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पांडुरंग विठ्ठल शेलार, वय ३५, अंजली पांडुरंग शेलार आणि अनिल बळीराम पवार, वय ३८, तिघेही रा. वहाळ घडशीवाडी, ता. चिपळूण, यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०७ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिलच्या मृत्यूची माहिती मिळताच सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आवश्यक पंचनामा केला. यावेळी साहिलच्या कपड्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत काही व्यक्तींमुळे झालेला कथित मानसिक त्रास आणि बदनामी याबाबत उल्लेख असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे ही चिठ्ठी या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा मानली जात असून, तिच्यातील मजकुराची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.
फिर्यादीत करण्यात आलेल्या आरोपानुसार, अंजली शेलार या वहाळ येथील डॉ. सहस्त्रबुद्धे यांच्या रुग्णालयात काम करत असताना साहिलचा मोबाईल फोन वापरत होत्या. १ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास त्या साहिलच्या मोबाईलवरून अनिल पवार याच्याशी बोलत असताना त्यांचे पती पांडुरंग शेलार यांनी पाहिल्याचा आरोप आहे.
यानंतर या घटनेचा संबंध साहिलशी जोडण्यात आला आणि त्याच्यावर आरोप करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढे पांडुरंग शेलार यांनी साहिलला फोन करून बोलावून घेतले आणि त्याच्यावर दबाव आणल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे साहिलची गावात बदनामी झाली आणि त्याला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संबंधित तिघांनी संगनमताने कथित मानसिक छळ आणि बदनामी केल्यामुळे साहिलने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी सृष्टी सुधाकर भागडे, वय २९, रा. वहाळ घडशीवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावर्डे पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आता चिठ्ठीतील मजकूर, संबंधित व्यक्तींमधील संवाद, मोबाईल कॉल रेकॉर्ड तसेच संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी केली जात आहे.
मृत्यूपूर्वीची चिठ्ठी या तपासातील महत्त्वाचा पुरावा मानली जात असली, तरी त्यातील उल्लेख आणि फिर्यादीत करण्यात आलेले आरोप सध्या तपासाधीन आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तसेच साहिलच्या आत्महत्येमागील नेमका घटनाक्रम पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, १७ वर्षीय साहिलच्या मृत्यूमुळे वहाळ घडशीवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.