मंडणगड प्रतिनिधी : गणेशेत्सवीचे निमीत्ताने तालुक्यातील पालघरवाडी येथे गेली अनेक वर्षे सामाजिक संदेश देत सुरु असलेल्या व उपक्रमातून साकारण्यात येत असलेल्या आकर्षक देखाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार सुनील तटकरे यांनी ५ऑकटोंबर २०२६ रोजी भेट देत पाहणी केली. ओबीसी जिल्हाध्यक्ष राकेश साळुंखे यांच्या पुढाकारातून ही भेट घडवून आणण्यात आली.
यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी संपूर्ण देखावा पाहून त्यामागील संकल्पना व सामाजिक संदेशाचे कौतुक केले. देखावा पाहताना ते भारावून गेले. तसेच पालघरवाडीचा पूर्वइतिहास आणि येथील सामाजिक उपक्रमांची माहितीही त्यांनी जाणून घेतली.
यावेळी खासदार तटकरे यांनी पालघरवाडीशी असलेले आपले ऋणानुबंध व्यक्त केले. दगडूशेठ हलवाई गणपतीचे गेली ४५ वर्षे नियमित दर्शन घेत असून, यापुढेही पालघरवाडीतील गणपती व देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी नियमितपणे येत राहू, असे आश्वासन त्यांनी दिले.
पालघरवाडीच्या आवश्यक गरजा तसेच विकासकामांसाठी खासदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही खासदार तटकरे यांनी यावेळी दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी खासदारांचे आभार मानले.
दरम्यान, पुढील सभेला विलंब होण्याची शक्यता असतानाही पालघरवाडीतील हा अविस्मरणीय क्षण आपल्या हातून निसटू नये, असा आग्रह कार्यकर्ते राकेश साळुंखे यांनी केल्यामुळे आपण पालघरवाडीला भेट दिली, असा आवर्जून उल्लेख खासदार सुनील तटकरे यांनी केला. यावेळी त्यांनी गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीचा गौरवपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
खासदारांच्या या भेटीमुळे पालघरवाडीतील ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक उपक्रमातून साकारलेल्या देखाव्याला मिळालेल्या या कौतुकामुळे ग्रामस्थांचा उत्साह आणखी वाढला आहे.












