एक जखमी गोव्यात हलविले
दोडामार्ग ( प्रतिनिधी):
दोडामार्ग-गोवा मुख्य रस्त्यावर आज सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास के. के. ९९ दुकानासमोर दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात परमे गावातील रहिवासी सुभाष गावडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
परमे गावातील गावडे हे दोडामार्ग तहसीलदार कार्यलयात कामा निमित्त जात होते त्यावेळी दोडामार्ग-गोवा मार्गावरून जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात घडताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. अपघाताचे गांभीर्य ओळखून ‘दोडामार्ग तालुका हेल्पलाइन ग्रुप’चे अध्यक्ष वैभव इनामदार व कसई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी तत्परता दाखवत वैभव इनामदार यांनी स्वतः च्या गाडीने जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात परमे येथील सुभाष गावडे यांच्या तोंडाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारांनंतर त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी गोवा येथील बांबोळी (BAMBOLIM) शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
वैभव इनामदार आणि स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जखमींवर वेळेत उपचार सुरू होऊ शकले, याबद्दल नागरिकांमधून त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.













