ग्रामस्थ व शिक्षक श्री दवंडे यांचा स्तुत्य उपक्रम
मंडणगड प्रतिनिधी: तालुक्यातील पंदेरी गावातील पाटीलवाडी येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कुणबी समाज मंदिरात ५ ऑक्टोबर २०२६ पासून अभ्यासिका वर्ग सुरू करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि शिक्षक दवंडे ग यांच्या विशेष पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
गावातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व गुणांची टक्केवारी वाढावी, त्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळावे तसेच गावातील मुलांनी शिक्षणाच्या माध्यमातून उंच शिखर गाठून गावाचे, तालुक्याचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करावे, या उद्देशाने अभ्यासिका वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये नियमित अभ्यासाची सवय निर्माण करण्यासाठी शिक्षक श्री दवंडे यांचे वेळोवेळी विशेष सहकार्य लाभणार आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे गावातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
सर्व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका खुली असून जात-धर्माचा कोणताही भेद न करता सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उपक्रमाचे शुभारंभाकरिता ग्रामिण अध्यक्ष दत्ताराम बिजन, उपाध्यक्ष गणेश गोरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रघुनाथ कोबनांक, विनोद कोबनांक, माजी अध्यक्ष कृष्णा कोबनांक, गोविंद पोस्टरे, कुमार अनिल कोबनांक यांच्यासह अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
गावातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरू करण्यात आलेला हा अभ्यासिका उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून, इतर गावांसाठीही आदर्श ठरणारा आहे.













