हिंदी-मराठी भक्तिगीते, भजने व भावगीतांच्या सादरीकरणातून संगीतकलेचा जागर
मंडणगड प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात मंडणगड शहरात ‘स्वर साधना ग्रुप’च्या वतीने कराओके संगीत प्रकारातून गणेशाची आराधना करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरातील विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये ग्रुपचे कलाकार हिंदी-मराठी भक्तिगीते, भजने, भावगीते तसेच लोकप्रिय बॉलीवुड गीतांचे सादरीकरण करून रसिकांना संगीताची मेजवानी देत आहेत.
या उपक्रमामध्ये संगीत संयोजक पत्रकार विश्वदास लोखंडे, काजल लोखंडे, तेजकुमार लोखंडे, मीना पटेल, विलास जाधव, दीपाली काटकर यांच्यासह विविध कलाकार सहभागी होत आहेत. पारंपरिक भजने व भक्तिगीतांसोबतच हिंदी-मराठी चित्रपटगीते, भावगीते आणि लोकप्रिय गीतांचे कराओके पद्धतीने सादरीकरण करण्यात येत असल्याने गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांना विशेष रंगत येत आहे.
मंडणगड शहरातील संगीतकला जिवंत ठेवण्याबरोबरच नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा स्वर साधना ग्रुपच्या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे. नव्या गायकांना गाण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रत्यक्ष कार्यक्रमांमध्ये सादरीकरणाची संधी दिली जाते. त्यामुळे संगीत शिकण्याची इच्छा असलेल्या नवोदित कलाकारांना आत्मविश्वास मिळत असून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळत आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध ठिकाणी होणाऱ्या या संगीत कार्यक्रमांना नागरिक व रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भक्ती, मनोरंजन आणि नवोदित कलाकारांना प्रोत्साहन यांचा सुरेल संगम साधणाऱ्या स्वर साधना ग्रुपच्या या उपक्रमातून मंडणगडमध्ये संगीत संस्कृतीला चालना मिळत आहे.












