निरवडे नमसवाडीत सापडला उत्तर प्रदेश मधील युवकाचा मृतदेह 

इन्सुली येथील तिलारी धरण कालव्यात मृतदेह सापडल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकासमोर असलेल्या हॉटेल कोकण क्राऊन लगत निरवडे नमसवाडी रस्त्यावर एका २३ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. आजीम खान ( रा. उत्तर प्रदेश ) असे त्याचे नाव आहे. मात्र, त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला व त्याचा मृतदेह त्या ठिकाणी कोणी टाकला किंवा कसा आला त्याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

निरवडे नमसवाडी येशील रॉनी डिसोजा व शरद पारकर हे मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नमसवाडी येथे जात असताना त्यांच्या रस्त्यालगत एका अज्ञात युवकाचा मृतदेह निदर्शनास झाला. त्यांनी याबाबतची माहिती सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष तथा निरवडे गावचे माजी सरपंच प्रमोद गावडे यांना दिली. त्यानंतर प्रमोद गावडे यांच्यासह निरवडे पोलीस पाटील अजित वैज घटनास्थळी दाखल झाले. त्यांना सदरचा युवक मृत असल्याची खात्री पटल्यावर सावंतवाडी पोलिसांना संपर्क केला.

त्यानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, हवालदार हनुमंत धोत्रे, सुरेश पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवला. मृतदेहा शेजारी सापडलेल्या बॅगेत संबंधित युवकाचे आधार कार्ड सापडून आल्याने मृतदेहाची ओळख पटली. मात्र सदरचा युवक किंवा त्याचा मृतदेह या ठिकाणी कसा आला याबाबत आता पोलीस तपास करीत आहेत. त्याच्या बॅगेत नवीन मोबाईल खरेदी केल्याची रिसीट, तसेच अन्य काही वस्तूही आढळून आल्या. याबाबत सावंतवाडी पोलिसात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.