सावंतवाडी राजवाड्यात नगराध्यक्षांकडून भव्य स्वागत
सावंतवाडी । प्रतिनिधी :इंग्रजी माध्यमांची रेषा लहान कमी करण्यापेक्षा मराठी शाळांची स्वतःची रेषा कशी मोठी करता येईल, याच दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभाग सध्या कार्यरत आहे. राज्यातील कोणतीही मराठी शाळा बंद पडणार नाही, याची पूर्ण काळजी शासन घेईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सावंतवाडी येथे दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. उष्णतेची गंभीर समस्या आणि वातावरणीय बदलांचा विचार करता शाळांच्या वेळेबाबतचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडीत आगमन झाल्यानंतर राजघराण्याच्या वतीने युवराज लखमराजे भोंसले आणि युवराज्ञी तथा नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे स्वागत केले. या प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपुर्वा बासुर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, प्रांताधिकारी वीरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील आणि वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना शिक्षणमंत्री भुसे म्हणाले की, शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रव्यापी शिक्षणाचा सविस्तर आढावा घेतला जात आहे. कोकण भाग हा शैक्षणिकदृष्ट्या राज्यात नेहमीच आघाडीवर राहिला असून दहावी व बारावीच्या निकालांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने सातत्याने अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे इथल्या शैक्षणिक क्षेत्रातील चांगल्या आणि उत्कृष्ट गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रात कशा लागू करता येतील, या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षा सर्वांसाठी खुल्या झाल्या असल्याने स्थानिक तरुणांना या परीक्षांची योग्य तयारी करता यावी यासाठी सरकार विशेष प्रयत्नशील आहे.
मराठी शाळांच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्यातील शाळांची पटसंख्या आणि शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी शासन तत्पर आहे. येत्या पाच महिन्यांच्या कालावधीत टप्पा अनुदान दिले जाईल, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली आहे. प्रत्येक मराठी शाळेत मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. गुणवत्तेसोबतच उद्याचा भावी नागरिक प्रखर राष्ट्रभक्त कसा घडेल आणि स्वतःच्या पायावर कसा उभा राहील, यादृष्टीने शिक्षण पद्धतीत आवश्यक बदल केले जात आहेत.
विरोधकांच्या आंदोलनावर टीका करताना ते म्हणाले की, बेरोजगारी आणि इतर काही अडीअडचणी नक्कीच आहेत, पण या समस्या रातोरात निर्माण झालेल्या नाहीत. आज जे आंदोलने करत आहेत त्यांनी वर्षानुवर्षे सत्ता भोगली आहे; त्यांनी त्यांच्या कार्यकाळात हे प्रश्न सोडवले असते तर आज ही वेळ आली नसती.
महाराष्ट्रातील दुष्काळजन्य परिस्थितीवर बोलताना भुसे यांनी सांगितले की, पावसाच्या खंडामुळे राज्यातील २५० पेक्षा जास्त तालुके दुष्काळाच्या छायेत आले आहेत. कोकणातही नेहमीपेक्षा कमी पाऊस पडल्याने प्रमुख भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या कठीण काळात मुख्यमंत्री स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सर्व बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.












