संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार ; लोकसभागातून जलसंधारणाला बळ
मालवण | प्रतिनिधी : आगामी काळात दुष्काळसदृश परिस्थिती व संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता जाणवू नये, यासाठी आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने व श्रमदानातून गाव परिसरात बंधारा उभारण्यात आला. या उपक्रमामुळे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार असून परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या भूजल पातळीत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
उन्हाळ्यात गावातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये, यासाठी ग्रामपंचायतीने आतापासूनच नियोजनबद्ध जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमातून ‘गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी लोकसहभागातूनच प्रभावी उपाय’ हा संदेश देण्यात आला आहे.
बंधाऱ्यामुळे वाहून जाणारे पाणी अडवले जाणार असून त्याचा थेट फायदा भूजल पुनर्भरणाला होणार आहे. परिणामी परिसरातील विहिरी व कूपनलिकांमध्ये पाणीसाठा टिकून राहण्यास मदत होईल. आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता ग्रामपंचायतीने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
बंधारा उभारणी व श्रमदानाच्या उपक्रमावेळी सरपंच रश्मी टेंबुलकर, ग्रामपंचायत अधिकारी आत्माराम जोशी, केंद्रचालक प्रिशा बांदल, कर्मचारी विजय चव्हाण, माजी सरपंच रविंद्र टेंबुलकर यांच्यासह ग्रामस्थ चंद्रकांत घाटगे, मोहन घाटगे, मनोहर घाटगे, विजय सुकाळी, शरद घाटगे व इतर उपस्थित होते.













