९ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
माडखोल । लखन आडेलकर :श्री देवी पावणाई देवस्थान मानकरी व समस्त माडखोल ग्रामस्थांच्या वतीने श्री देवी पावणाई मंदिरामध्ये दसरोत्सवानिमित्त भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचा प्रारंभ रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ पासून होत असून मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी विजयादशमी व शिवलग्न सोहळ्याने या उत्सवाची सांगता होणार आहे.
उत्सवादरम्यान दररोज संध्याकाळी ७.०० वाजता देवीची महाआरती आणि दुपारी १२.३० ते ३.०० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनिक कार्यक्रमांमध्ये दररोज संध्याकाळी ७.०० ते ७.३० या वेळेत देवीची आरती संपन्न होईल.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी, रविवारी ११ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.३० वाजता माडखोल म्हालटकरवाडी व मधलीवाडी यांचे संयुक्तिक भजन तसेच रात्री ८.३० वाजता श्री देव हेळेकर दशावतार नाट्यमंडळ, कारीवडे यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला जाईल. या कार्यक्रमाचे पुरस्कृत माडखोल येथील बागायतदार शेतकरी श्री. प्रफुल कुशावह हे आहेत. दुसऱ्या दिवशी, सोमवारी १२ ऑक्टोबर रोजी माडखोल डुंगेवाडी व मेस्त्रीवाडी यांचे संयुक्तिक भजन आणि रात्री ८.३० वाजता दत्तप्रसाद फुगडी मंडळ, भटवाडी, सावंतवाडी यांचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते श्री. सुनील तुकाराम राऊळ (माडखोल) व सौ. सरिता भालचंद्र परब/राऊळ (मुंबई) हे आहेत.
तिसऱ्या दिवशी, मंगळवारी १३ ऑक्टोबर रोजी श्री देवी पावणाई समई नृत्य किंजवडे-देवगड यांचा बहारदार समई नृत्याचा कार्यक्रम आणि रात्री ८.३० वाजता श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग पार पडेल. या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते प्रज्ञात प्रविण ललवाणी, श्रीनिवासन, महादेव तावडे आणि कदम्बा ॲग्रो फार्म, माडखोल हे आहेत. चौथ्या दिवशी, बुधवारी १४ ऑक्टोबर रोजी माडखोल टेंबवाडी व फौजदारवाडी मंडळाचे भजन आणि रात्री ८.३० वाजता त्रिमुर्ती दांडिया ग्रुप, (वेंगुर्ला) यांचा बहारदार दांडिया आयोजित करण्यात आला असून याचे पुरस्कर्ते भाजप युवा नेते व प्रसिद्ध उद्योजक श्री. विशाल प्रभाकर परब हे आहेत.
पाचव्या दिवशी, गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी जि.प.शाळा नं.१, जि.प.शाळा नं.२ धवडकी आणि माध्यमिक विद्यालय (हायस्कूल) माडखोल या शाळांमधील मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील. या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते प्रो.प्रा. योगेश्वरी एंटरप्रायजेसचे श्री. गजानन गोविंदराव जोगळेकर हे आहेत. सहाव्या दिवशी, शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी बामणादेवी, लातयेवस भजन मंडळ, माडखोल यांचे भजन व रात्री ८.३० वाजता सखी फुगडी संघ, पावशी-कुडाळ यांचा फुगडीचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते माजी सरपंच व भाजप युवा नेते श्री. विनोद राऊळ हे आहेत.
सातव्या दिवशी, शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ, भैरववाडी यांची फुगडी आणि रात्री ८.३० वाजता ॐ सिद्धी प्रसादक भजन मंडळ, माडखोल नमसवाडी (बुवा: गोविंद शेटकर) यांचे भजन होईल. या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते शिवसेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक व नगरपरिषद सावंतवाडीचे श्री. सच्चिदानंद उर्फ संजू परब हे आहेत. आठव्या दिवशी, रविवारी १८ ऑक्टोबर रोजी बुवा श्री. सुदीप गावडे (श्री कालिका देवी प्रासादिक भजन मंडळ, कारीवडे) यांचे भजन आणि रात्री ८.३० वाजता श्री देव दाडोबा दांडिया ग्रुप, दांडेली यांचा दांडिया कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते श्री देव काजरेकर कला क्रीडा मंडळ, माडखोल (फौजदारवाडी) व समस्त फौजदारवाडी ग्रामस्थ आहेत.
नवव्या दिवशी, सोमवारी १९ ऑक्टोबर रोजी गावातील स्थानिक ग्रामस्थांचे भजन, फुगडी आणि दांडिया हे विविध कार्यक्रम पार पडतील. या दिवसाचे पुरस्कर्ते भाजप जिल्हा सरचिटणीस व सिंधुदुर्ग बँक संचालक श्री. महेश सारंग, माडखोल दुग्ध व्यावसायिक श्री. प्रभाकर देसाई आणि V.P. College of Pharmacy Madkhol हे आहेत.
उत्सवाची सांगता मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता विजयादशमी व शिवलग्न सोहळ्याने अत्यंत थाटामाटात होणार आहे. या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आग्रहाचे निमंत्रण श्री देवी पावणाई देवस्थान मानकरी व समस्त माडखोल ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे.













