वेळणेश्वर येथे रक्तदान शिबिर संपन्न

गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्षाच्या वतीने दिनांक 5 ऑक्टोबर 2026 रोजी महाविद्यालयाच्या नाना फडणवीस सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास एकूण 36 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, एका रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होते. हा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या शिबिरास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरासाठी सिटी हॉस्पिटल, रत्नागिरी यांच्या रक्तदान पथकाने विशेष सहकार्य केले. रक्तदात्यांची तपासणी, रक्तसंकलन व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन रक्तदान पथकाच्या वतीने करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच NSS कक्षाच्या नियोजन व सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.