विकसित भारताच्या धर्तीवर विकसित कोकणाचा संकल्प करा; ‘चलो गाव’च्या माध्यमातून गावांचा विकास साधा- आ. प्रमोद जठार

तुम्हीच तुमच्या गावाचे शिल्पकार’; २०४७ पर्यंत गावांच्या विकासाचा संकल्प करण्याचे आवाहन

खेड (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने खेड येथील गणेश कृपा मंगल कार्यालयात ‘विकसित भारत संकल्प सभा’ उत्साहात संपन्न झाली. यावेळी दिल्ली येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर करण्यात आले. देशाच्या विकासाची दिशा, राष्ट्रनिर्माणाचा संकल्प आणि आगामी भारताचे सामर्थ्य याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले विचार उपस्थित भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ऐकले. त्यानंतर भाजपा आमदार प्रमोद जठार यांनी आपल्या भाषणातून विकसित भारताच्या संकल्पाशी कोकणच्या विकासाचा धागा जोडत गावागावात विकासाचे काम पोहोचविण्याचे आवाहन केले.
आमदार प्रमोद जठार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याचा संकल्प केला आहे. त्याच धर्तीवर आपण विकसित कोकणाचा संकल्प केला पाहिजे. सर्वसामान्य माणूस आणि गावांचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने कोकणचा विकास होईल. त्यामुळे प्रत्येक गावाच्या विकासाचा सामूहिक संकल्प करून तो २०४७ पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. गावांच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून ‘चलो गाव’ हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या २५ वर्षांच्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देताना जठार यांनी त्यांच्या संघर्षाचा आणि संकल्पपूर्तीचा उल्लेख केला. “२५ वर्षांपूर्वी मी कोणतीही निवडणूक लढवली नव्हती आणि या २५ वर्षांत कोणतीही निवडणूक हरलो नाही,” या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत पद मिळाल्यानंतर प्रत्येकाने एखादा संकल्प करून तो पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, हा त्यांच्या भाषणाचा संदेश असल्याचे जठार यांनी सांगितले.
आपल्या निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी कासार्डे येथे आले होते. त्यावेळी त्यांनी उंदील गावाबाबतही विचारणा केली होती. या परिसराशी त्यांचा जुना संबंध असून ते दर सहा महिन्यांनी या भागात येत आणि आपल्या गुरुजींची सेवा करत असत, अशी आठवणही जठार यांनी यावेळी सांगितली.
“भाजपमध्ये काहीही होऊ शकते. चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो आणि भांडुपमध्ये युवा मोर्चाचे काम करणारा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो. हे केवळ भाजपमध्ये शक्य आहे,” असे सांगत त्यांनी सामान्य कार्यकर्त्याला संघटनेत मिळणाऱ्या संधीचा उल्लेख केला. पद मिळाल्यानंतर केवळ पदाचा उपयोग न करता समाजासाठी काहीतरी करण्याचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विकसित भारताचा संकल्प सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘सेवा ज्योती यात्रा’ गावागावात आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे जठार यांनी सांगितले. प्रत्येक गावाच्या वेशीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि ‘विकसित भारत संकल्प’ असा संदेश असलेला बॅनर लावण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तालुक्यातील पक्ष कार्यालये अधिक सक्रिय आणि अद्ययावत झाली पाहिजेत. प्रत्येक कार्यकर्त्याचे घर हेच पक्षाचे कार्यालय झाले पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन नागरिकांच्या प्रश्नांची माहिती घेत त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
गावाच्या विकासाची जबाबदारी केवळ सरकार किंवा लोकप्रतिनिधींवर न सोपविता स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेतला पाहिजे, असे सांगताना जठार यांनी “तुम्हीच तुमच्या गावाचे शिल्पकार आहात,” असा संदेश दिला. कर्जमाफीच्या प्रश्नाचा संदर्भ देताना त्यांनी “मोदी साहेबांनी कर्जमाफी केली, फडणवीसांनी केली; पण माझ्या गावातल्या माणसाची कर्जमाफी झाली का?” असा सवाल उपस्थित केला. सरकारी निर्णयांचा प्रत्यक्ष लाभ गावातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतो आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
कोकणातील स्थानिक व्यवसाय आणि मच्छीमारांच्या प्रश्नांचाही त्यांनी उल्लेख केला. चिरा व्यावसायिकांना २०२१ पासून लागू असलेल्या जीएसटीच्या प्रश्नात कोकण आयुक्त आणि जीएसटी कमिशनर यांच्या माध्यमातून बदल करून तो २०२५ पासून लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोकणातील मच्छीमारांच्या जीएसटीच्या प्रश्नाबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तत्काळ निर्णय घेतल्याचा दावाही त्यांनी केला.
कोकणातील स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. गावातील प्रश्न तालुका, जिल्हा आणि राज्याच्या पातळीवर नेऊन त्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची कार्यपद्धती उभी करण्याची गरज असल्याचेही जठार यांनी स्पष्ट केले.
“राजकारण हा मर्दाचा खेळ आहे, तो खेळला पाहिजे,” असे सांगत जठार यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय राजकारण आणि जनसेवेचे आवाहन केले. आज करण्यात आलेला विकसित भारत आणि विकसित कोकणाचा संकल्प २०२९ पर्यंत गावागावात पोहोचविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा रत्नागिरी जिल्हा महामंत्री तथा गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव कदम, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा कोकण पदवीधर प्रकोष्ठ कोअर कमिटीचे सहसंयोजक अजय दळवी, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, खेड उत्तर तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, दक्षिण खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
याशिवाय नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका तथा दापोली महिला तालुका अध्यक्षा जया साळवी, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चा खेड तालुकाध्यक्ष उर्मिला शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशा सनगरे, भाजपा महिला मोर्चा खेड शहर चिटणीस ममता दांडेकर, संजीवनी शेलार, आर्या कारेकर, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष तथा भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश बामणे, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संदेश भुवड, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल खेड तालुकाध्यक्ष सुयश खेडेकर, भाजपा रिक्षा युनिट खेड उपतालुकाध्यक्ष तुषार पवार, भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय तोडकरी, विनायक शिरगावकर, भाजपा खेड शहर शक्तीकेंद्र प्रमुख वैजेश सागवेकर, भाजपा किसान मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस धीरज पटेल, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्ष विशाल होळकर, उपाध्यक्ष अविराज मोरे, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, तळे-सोंडे विभाग बूथ अध्यक्ष दत्तात्रय मोरे, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, शहर चिटणीस अनिकेत पवार, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, तसेच बाळू वर्मा, राहुल प्रभू, प्रदीप भोसले यांच्यासह भाजपा पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेड येथील ‘विकसित भारत संकल्प सभा’च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. त्यानंतर आ. प्रमोद जठार यांनी विकसित भारताच्या धर्तीवर विकसित कोकण आणि गावांच्या विकासाचा संकल्प मांडत हा संकल्प गावागावात पोहोचविण्याचे आवाहन केले.