आय.टी.आय. फोंडाघाट येथे ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत तसेच व्यसनमुक्ती सप्ताह निमित्ताने’नशा मुक्ती जनजागृती अभियान’ उत्साहात संपन्न !

नशामुक्त राहण्यासाठी, मुलांनी सकारात्मक राहणे आवश्यक असते — अर्पिता मुंबरकर

फोंडाघाट (कुमार नाडकर्णी): नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्ग , जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, व्यसनमुक्ती सल्ला केंद्र गोपुरी आश्रम वागदे यांच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) फोंडाघाट येथे ‘सेवा संकल्प अभियानातंर्गत *’नशा मुक्ती अभियान’* अत्यंत गांभीर्याने व उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य मा. श्री. बी. पी. सोनवणे हे होते.अमली पदार्थांचे दुष्परिणाम व नशा मुक्तीबाबत सखोल मार्गदर्शन करताना

प्रमुख वक्त्या व मार्गदर्शिका नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक आणि नशा मुक्त भारत अभियान समिती सदस्य अर्पिता मुंबरकर यांनी विद्यार्थ्यांना नशा मुक्ती आणि व्यसनाधीनतेच्या गंभीर आव्हानांवर सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, “आजची तरुण पिढी हे देशाचे भवितव्य आहे. मात्र, क्षणिक आनंद, उत्सुकता किंवा मित्रांच्या चुकीच्या संगतीमुळे अनेक तरुण अमली पदार्थ व व्यसनांच्या जाळ्यात अडकत आहेत. व्यसन हे केवळ व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्यच नष्ट करत नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाची उद्ध्वस्तता घडवून आणते.त्यांनी पुढे सांगितले की, “नशामुक्त राहण्यासाठी तरुणांनी खेळ, कला, अवांतर वाचन आणि अभ्यासासारख्या सकारात्मक गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवले पाहिजे. जर दुर्दैवाने कोणी या विळख्यात अडकले असेल, तर योग्य समुपदेशन(Counseling) वैद्यकीय उपचार आणि कुटुंबाच्या सहकार्याने यातून नक्कीच बाहेर पडता येते. निरोगी व समृद्ध आयुष्यासाठी व्यसनांना ‘नाही’ म्हणण्याची सवय प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे.”

 

 

 

मार्गदर्शनानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याचा आणि आपला परिसर व समाज नशामुक्त करण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचा दृढ संकल्प करत ‘नशा मुक्ती प्रतिज्ञा’ घेतली.या संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत सूत्रबद्ध व प्रभावी सूत्रसंचालन तसेच शेवटी सर्व उपस्थितांचे आभार प्रदर्शन निदेशक अभिषेक जोशी यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे गटनिदेशक ए. के. शिरोडकर, निदेशक भास्कर पाटील, सतीश मेस्त्री, स्वप्नील विश्वांभरे, गणेश मराठे, सायली तळवडेकर; कनिष्ठ लिपिक एल. जी. असोलकर, IMC लिपिक मयुरेश पराडकर, भंडारपाल राहुल पाटील तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी एस. एस. आचरेकर, रामचंद्र इस्वलकर आणि संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी/विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.