जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोनशी येथे जागतिक शिक्षक दिन उत्साहात साजरा

कोनशी, सावंतवाडी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोनशी येथे ५ ऑक्टोबर २०२६ रोजी ६०वा जागतिक शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या जागतिक शिक्षक दिनाची थीम “Standing with Teachers – 60 years of protecting the profession, advancing its status and shaping our futures” अर्थात “शिक्षकांसोबत ठामपणे उभे राहूया – ६० वर्षे शिक्षक पेशाचे संरक्षण, दर्जा वृद्धिंगतीकरण आणि आपले उज्ज्वल भविष्य घडविणे” अशी आहे.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवीधर शिक्षक डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी केले. यावेळी जागतिक शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता सातवीतील विद्यार्थी वेदांत बर्वे याने शिक्षक दिनाचे महत्त्व आणि शिक्षकांविषयीचे आपले विचार व्यक्त केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मुख्याध्यापक श्री. बाबुराव पास्ते यांनी मार्गदर्शन करताना ६०व्या जागतिक शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा घटक नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच समाजाच्या आणि राष्ट्राच्या भवितव्याला आकार देणारा महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील विद्यार्थी बापू गवस याने प्रभावीपणे केले, तर इयत्ता सहावीतील ऋषिकेश सावंत याने उपस्थितांचे आभार मानले.

 

यावेळी उपशिक्षिका श्रीमती स्वाती देसाई, पोषण आहार मदतनीस श्रीमती सुविद्या गवस तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तांबुळी केंद्रप्रमुख श्रीमती ज्योत्स्ना देसाई, शालेय व्यवस्थापन समितीचे श्री. सौरभ सिद्धये व श्री. सिद्धेश गवस यांचे मार्गदर्शन लाभले.

 

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांविषयी व्यक्त झालेला आदर आणि जागतिक शिक्षक दिनाच्या संकल्पनेचा घेतलेला अर्थपूर्ण आढावा यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.