महिलांप्रमाणेच युवकांनाही रोजगाराभिमुख प्रशिक्षण द्या 

रोजगार मेळावा समिती सदस्य

अमोल टेंबकर यांची नगराध्यक्षांकडे मागणी

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने महिला आणि युवतींसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक प्रशिक्षण वर्गांचा लाभ शहरातील युवकांनाही मिळावा, अशी मागणी जिल्हास्तरीय रोजगार मेळावा समितीचे सदस्य अमोल टेंबकर यांनी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांच्याकडे केली आहे. या मागणीबाबत नगराध्यक्षांसह सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.

सावंतवाडी नगरपरिषद महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने शहरातील १८ ते ४५ वयोगटातील महिला व युवतींच्या सक्षमीकरणासाठी कॅटरिंग, कुकींग, अ‍ॅडव्हान्स फॅशन डिझायनिंग, टू-व्हीलर व फोर-व्हीलर ड्रायव्हिंग, ज्युदो-कराटे आणि संगणक प्रशिक्षण अशा रोजगाराभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करत अमोल टेंबकर यांनी या प्रशिक्षणाचा विस्तार करून त्यात युवकांनाही संधी देण्याची विनंती केली.

युवकांनी कॅटरिंग, फॅशन डिझायनिंग, ड्रायव्हिंग व संगणक यांसारखी कौशल्याधारित प्रशिक्षणे पूर्ण केल्यास त्यांना नोकरीसह स्वयंरोजगाराच्या उत्तम संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी नगरपरिषदेने दारिद्र्यरेषेखालील युवक-युवतींसाठी एमएससीआयटी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रम राबवले होते, ज्याचा विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी मोठा फायदा झाला होता. त्याच धर्तीवर सध्याच्या योजनेत आवश्यक ते बदल करून अथवा नवा ठराव घेऊन युवकांचा समावेश करावा, असे टेंबकर यांनी स्पष्ट केले.

या मागणीबाबत अमोल टेंबकर यांनी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, महिला व बाल कल्याण सभापती दिपाली भालेकर आणि आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांचेही लक्ष वेधले. सर्व पदाधिकाऱ्यांनी यावर सकारात्मकता दर्शवली असून, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.