सावंतवाडी बाजारपेठेत खेकड्यांची आवक वाढली; पावसाळी मेजवानीसाठी खवय्यांची गर्दी

सावंतवाडी। तनया रेडकर

 

कोकण हा निसर्ग संपन्नतेने श्रीमंत आहे, असे म्हटले जाते ते काही उगाच नाही. डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र आणि समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या कोकणात प्रत्येक ऋतूची एक वेगळी ओळख आहे. पावसाळा सुरू झाला की कोकणवासीयांच्या जीवनात आणि खाद्यसंस्कृतीतही एक वेगळीच रंगत येते. याच काळात चढणीचे मासे आणि गावठी खेकड्यांच्या मेजवानीला सुरुवात होते.

 

पावसाच्या आगमनानंतर सावंतवाडी बाजारपेठेत सध्या नदी-नाल्यांमधून पकडण्यात येणाऱ्या ताज्या खेकड्यांची आवक सुरू झाली आहे. गावागावांतील स्थानिक नागरिक पारंपरिक पद्धतीने पकडलेले खेकडे विक्रीसाठी बाजारात घेऊन येत आहेत. त्यामुळे खेकडे खरेदी करण्यासाठी खवय्यांची गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

कोकणात पावसाळा सुरू झाला की अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी खेकडे पकडण्याची लगबग सुरू होते. मालवणी भाषेत कुर्ले म्हणून ओळखले जाणारे हे खेकडे पकडण्यासाठी स्थानिक लोक पारंपरिक साधनांचा वापर करतात. खुळ, आक्या आणि गरी यांसारखी साधने घेऊन नागरिक भर पावसात रात्री ओहोळ, नदी-नाले आणि पाण्याने भरलेल्या परिसरात उतरतात. पाण्याच्या प्रवाहात आणि चिखलमय भागात सापडलेले हे खेकडे पकडून बाजारात आणले जातात.

 

समुद्रातील खेकड्यांच्या तुलनेत नदी-नाल्यांमधून मिळणाऱ्या या गावठी खेकड्यांची चव वेगळी असल्याचे खवय्यांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात घराघरांत खेकड्यांचा रस्सा, कालवण, मसालेदार भाजी आणि भाजलेले डेंग असे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. या पदार्थांमुळे कोकणी खाद्यसंस्कृतीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

 

मासेमारीचा बंदीचा काळ असला तरी पावसाळ्यात निसर्ग कोकणवासीयांना अशी चवदार देणगी देतो. खेकडे पकडणे हा केवळ खाद्यपरंपरेचा भाग नसून अनेक ग्रामीण कुटुंबांसाठी उत्पन्नाचे साधनही आहे. पावसाळ्यातील काही महिन्यांत या व्यवसायातून स्थानिकांना आर्थिक आधार मिळतो.

सध्या सावंतवाडी बाजारपेठेत खेकड्यांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असून, ताज्या खेकड्यांसाठी ग्राहक मोठ्या संख्येने बाजारात येत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीसोबतच कोकणातील ही पारंपरिक खाद्यपरंपरा पुन्हा एकदा जिवंत झाली आहे.