चिपळूण यु.इं. स्कूलचे ज्येष्ठ शिक्षक सुरेश केळकर यांचे निधन

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूल मधील एक ज्येष्ठ शिक्षक सुरेश केळकर तथा केळकर सर यांचे शुक्रवार दि. २ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मूळ गावी कोंडगाव-साखरपा येथे दुःखद निधन झाले. यावेळी त्यांचे वय सुमारे ८२ वर्षे होते. १९७० च्या काळात सर युनायटेड प्रशालेत नियुक्त झाले. गणित आणि शास्त्र हे त्यांचे अध्यापनाचे विषय होते.
मूळचे हुशार असलेल्या केळकर सरना वाचनाची खूप आवड होती सर्व प्रकारचे साहित्य ते वाचत असत. शाळेच्या कामात अत्यंत शिस्तबद्ध असलेले सर कडक शिस्तीचे होते. आपला विषय तन्मयतेने शिकवीत असताना अन्य अवांतर ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे या साठीही ते प्रयत्नशील होते.त्यांच्या घरात तेच सर्वात मोठे असल्याने त्यांना घराच्याही जबाबदाऱ्या पार पडाव्या लागल्या त्याही त्यांनी समर्थपणे पार पाडल्या त्यांच्या पत्नीचीही त्यांना मोलाची साथ लाभली. सर कडक असले तरीही ते खूप विद्यार्थीप्रिय होते. आज शाळेच्या असंख्य विद्यार्थ्यांच्या तोंडी त्यांचे नाव ऐकायला मिळते. १९८० साली शाळेचे काही वर्षांपूर्वी बंद झालेले स्नेहसंमेलन पुन्हा नव्याने सुरु झाले आणि त्यातही त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असे. मनोरंजनाचे कार्यक्रम बसविण्यात ते सहभागी असत.शाळा दोन सत्रात भरत असल्याने एकांकिकांच्या तालमी शाळेत रात्रीच घ्याव्या लागत. त्या घेउन रात्री सगळे विद्यार्थी घरोघर गेलेना हे पाहूनच सर आपल्या घरी जात असत. त्यावेळी आम्हा शिक्षकांकडे सायकल हेच एकमेव वाहन होते. हे सगळे करून शाळेच्या कामात कुठेही टंगळमंगळ नसे अर्थात हे पथ्य आम्ही सर्वच शिक्षक पाळत होतो.
शाळेत एखादा विद्यार्थी गरजू आहे असे त्यांना कळले तर त्यालाही लागेल ती मदत सर करीत असत. शालान्त परीक्षा जवळ आली की अनेक विद्यार्थी घरी पेपर सोडवून ते तपासायला शिक्षकांकडे देत ते पेपर कसून तपासून सर देत असत. एका काळात आजी विद्यार्थ्यांच्या संमेलनानंतर माजी विद्यार्थ्यांचे संमेलन असे आणि मग प्रेमजीभाई आसर एकांकिका स्पर्धा असत. त्यातही त्यांचा सहभाग असे, आम्ही या प्रकाराला आजी, माजी प्रेमजी असे म्हणत असू. निवृत्तीनंतर सर आपल्या गावी राहायला गेले. तेथेही गावातील उत्सवात त्यांचा सक्रीय सहभाग असे.
१९७२/७३ च्या दरम्याने काका किशाचा हे नाटक मित्र मंडळीनी बसविले होते. नंतर काही कालांतराने आम्ही त्या नाटकाचे काही प्रयोग केले होते. लक्ष्मीनारायण मंदिराशी होणाऱ्या उत्सवाच्या नाटकातही त्यांचा सहभाग होता.कै. धुरी सरांच्या गणपतीच्या कारखान्यातही सरांचा सहभाग होता. जुन२०२५ पासून सर आजारीच होते. त्यांच्या कुटुंबातील त्यांचे दोन मुलगे, सुना नातवंडे आणि पत्नी यांनी त्यांची खूप मनापासून सेवा केली. सगळी भावंडेही अलीकडे गणपती उत्सवात त्यांना भेटून गेली. त्यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी चिपळूणहून त्यांचे दोन विद्यार्थी माधव सोहोनी आणि दादा मोघे, पराग भावे, डॉ.प्रल्हाद काणे आणि सरांचे मामे बंधू डॉ. अशोक केतकर उपस्थित होते.