चिपळूण (प्रतिनिधी) : खेड तालुका शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ मध्ये न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आंबडसच्या अंडर-१४ व अंडर-१७ बॉईज संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत तालुकास्तरीय विजेतेपद पटकावले. दोन्ही संघांनी आपल्या दमदार खेळाच्या जोरावर जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षात आंबडस विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्राने पुन्हा एकदा ‘गरुड झेप’ घेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, शिस्त, संघभावना, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत विजेतेपद मिळविले.
या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एका मानाची भर पडली आहे. या दोन्ही संघांतील सर्व खेळाडू ज्ञान प्रबोधिनी व टाटा ट्रस्ट यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘ग्रामीण खेळाडू विकसन प्रकल्पा’तील खेळाडू आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून खेळाडूंना नियमित प्रशिक्षण, मार्गदर्शन तसेच क्रीडा विकासाच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. दोन्ही संघांना प्रशिक्षक संतोष शिंदे व महेश सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच मार्गदर्शक शिक्षक गणेश सावर्डेकर, कृष्णकांत कुंभार व भास्कर महाडीक यांनी खेळाडूंना वेळोवेळी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक वसंत यादव यांनीही खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन दिले. संघांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, शाळेचे चेअरमन, शालेय समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अंडर-१४ व अंडर-१७ संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेतही आंबडसचे दोन्ही संघ उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाचा व गावाचा नावलौकिक उंचावतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सुवर्ण महोत्सवी वर्षात मिळालेल्या या यशामुळे आंबडसच्या क्रीडा क्षेत्राने पुन्हा एकदा गरुड झेप घेतली आहे.













