अभिजात मराठी भाषा टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची

मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा आणि अस्मितेची ओळख : प्रा. संजयकुमार इंगोले

मंडणगड, प्रतिनिधी :

लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा विभाग आणि मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा दिना’निमित्त ‘अभिजात मराठी भाषेचा विकास’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. संजयकुमार इंगोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. संदीप निर्वाण यांनी अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. संजयकुमार इंगोले म्हणाले की, “कोणत्याही भाषेचे भवितव्य त्या भाषेचा प्रत्यक्ष व्यवहारातील वापर, संशोधन, ग्रंथनिर्मिती आणि ती भाषा बोलणाऱ्या लोकांचा स्वभाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर अवलंबून असते.” मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे. त्यामुळे अभिजात मराठी भाषा टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा विकास होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. संजयकुमार इंगोले, प्रा. वैभवी जोशी आणि श्री. रंजित म्हाप्रळकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभवी जोशी यांनी केले, तर आभार डॉ. महेश कुलकर्णी यांनी मानले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये, डॉ. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, प्रा. वैभवी जोशी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.