चिपळूणच्या ओंकार बापट यांची मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती

चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आता चिपळूणच्या ओंकार पांडुरंग बापट यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने याबाबतचा शासन निर्णय १ ऑक्टोबर रोजी जारी केला. त्यांच्याकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याची जबाबदारी राहणार आहे.या निवडीमुळे बापट यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रत्नागिरी जिल्हा वनसंपदा आणि जैवविविधतेने समृद्ध आहे. जिल्ह्यात विविध प्रकारचे वन्यप्राणी, पक्षी तसेच सागरी जीव आढळतात. वन्यजीवांचे संरक्षण आणि त्यांच्याबाबत जनजागृती करण्याच्या कामात मानद वन्यजीव रक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. या पार्श्वभूमीवर ओंकार बापट यांची झालेली नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. शासनाने वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामध्ये रत्नागिरीसाठी ओंकार बापट, तर नागपूर, अमरावती आणि रायगड जिल्ह्यांसाठीही स्वतंत्र नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
मानद वन्यजीव रक्षक म्हणून बापट यांच्यावर वन्यजीव संरक्षणाशी संबंधित कामात वन विभागाला सहकार्य करण्याची जबाबदारी राहणार आहे. वन्यजीवांशी संबंधित बाबींकडे लक्ष देणे, त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सहकार्य करणे आणि वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या कामात त्यांची भूमिका राहणार आहे बापट हे गेले काही वर्षे निसर्ग व वन्यजीव, पर्यावरण रक्षणासाठी काम करीत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना ही संधी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल वनखात्याच्या अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.